Chakan : सहाय्यक फौजदारावर 62 लाखांच्या अपहाराचा गुन्हा

एमपीसी न्यूज- चाकण पोलीस ठाण्यात मुद्देमाल कारकून असलेल्या सहायक फौजदारावर 62 लाख रुपये रकमेचा अपहार केल्या प्रकरणी गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली.

सहायक फौजदार राजेंद्र हरिदास चौधरी असे गुन्हे दाखल झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक विक्रम पासलकर यांनी सरकार पक्षाच्या वतीने पोलिसांत फिर्याद दिली असून त्यानुसार अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची माहिती अशी की, चाकण पोलीस ठाण्यात प्रलंबित गुन्ह्यांचा निपटारा करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे चाकण पोलीस ठाण्यात मुद्देमाल रजिस्टर प्रमाणे मुद्देमाल दाखविणे बाबत मुद्देमाल कारकून सहाय्यक फौजदार चौधरी यांना वेळोवेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवार यांच्याकडून आदेश देण्यात आले होते. मात्र चौधरी यांनी मुद्देमाल दाखवला नाही.

त्यामुळे 2018 ते अद्यापपर्यंत चाकण पोलीस ठाण्याचे मुद्देमाल कारकून चौधरी यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता ते लोकसेवक असूनही अधिकाराचा व पदाचा दुरुपयोग करून शासनाच्या रकमेचा व सोने, चांदी अशा किमती मुद्देमालाचा 62  लाख 26 हजार 523 एवढ्या रकमेचा अपहर केल्या प्रकरणी भा.दं. वि. कलम 406 409 188 सह. मुंबई पोलीस कायदा कलम 145 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवार यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.