Pimpri : दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर विक्रमने मिळवले युपीएससी परीक्षेत यश

एमपीसी न्यूज- शालेय जीवनात अभ्यासामध्ये अजिबात रस नसलेला, प्रत्येक निकालावर लाल शेरा पडणारा, शिक्षकांची कायम बोलणी खाणारा विद्यार्थी पुढील आयुष्यात काही यश संपादन करेल यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. पण तोच विद्यार्थी जेंव्हा यशाच्या अभिलाषेने जिद्दीने पेटून उठतो तेंव्हा चमत्कार घडतो. हाच चमत्कार घडला आहे पिंपरी, काळेवाडी येथे राहणाऱ्या विक्रम नढे पाटील याच्या आयुष्यात. विक्रमने एकाग्रतेने अभ्यास करून दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर युपीएससीच्या परीक्षेमध्ये भारतामध्ये 71 वा क्रमांक पटकावला. आज विक्रम नढे पाटील भारतीय वनसेवेमध्ये दाखल झाला आहे. त्याच्या यशाचा प्रवास त्याच्याच शब्दात……

‘माझा जन्म पिंपरी-चिंचवडमधील रहाटणी-काळेवाडी गावात झाला. माझे दहावीपर्यंतचे शिक्षण गावामध्येच झाले. शालेय जीवनात मला अभ्यासात जास्त रस नव्हता त्यामुळे प्रत्येक निकालावर लाल शेरा ठरलेला असायचा. शाळेतील काही शिक्षक म्हणायचे की तू अभ्यासात पुढे काहीही करू शकणार नाही. ऐकून वाईट वाटे. पण हेच शब्द पुढे मला प्रेरणा देत राहिले आणि माझी परिस्थिती बदलण्यासाठी कारणीभूत ठरले”माझे सर्व कुटुंब वारकरी संप्रदायातले. वडिलांना शिक्षणाची खूप आवड होती. पण घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना शिक्षण पूर्ण करता आले नाही. त्यांची शिक्षणाची इच्छा पूर्ण करायची होती. शिवाय वडील पोलीस पाटील व नगरसेवक असताना त्यांचे समाजकार्य मला कायम आकर्षित करे. हेच समाजकार्य पाहून मी युपीएससी करण्यास प्रेरित झालो’

‘दहावीत मला ६७ टक्के गुण मिळाले आणि मला माहिती मिळाली की कृषी पदवीचे शिक्षण (बीएससी अॅग्री) घेणारे बरेचजण अधिकारी होतात. म्हणून मी माझे ज्युनिअर कॉलेजचे शिक्षण मालोजीराजे शेती विद्यालय फलटण येथे घेतले. बारावीत मला विज्ञान शाखेत 80 टक्के गुण मिळाले आणि त्या मेरिटवर मला पुण्यातील शासकीय कृषी महाविद्यालयात प्रवेश मिळाला. महाविद्यालयात असताना मी एनसीसी, एनएसएसमार्फत शेतकरी मार्गदर्शन, ग्रामस्वच्छता, रायफल शूटिंग अशा विविध उपक्रमात सहभाग नोंदवला”माझे महाविद्यालयातील बी. एससी अॅग्रीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माझा स्पर्धा परीक्षेचा प्रवास सुरू झाला. प्रवास अत्यंत खडतर होता. दहावीपर्यंत पुस्तकांपासून दूर पळणारा मी प्रत्येक दिवशी जिद्दीने आणि चिकाटीने सकाळी साडेसात ते रात्री 12 पर्यंत जेवणाची वेळ सोडली तर पूर्ण वेळ अभ्यासिकेत असायचो. सुरुवातीच्या काळात मी युपीएससीची पूर्वपरीक्षा पास व्हायचो. पण मुख्य परीक्षेत अपयश येत होते. एवढा अभ्यास करून देखील अपयश येत असल्यामुळे खचून जायचो. पण या कठीण काळात माझे कुटुंबीय पाठीशी भक्कमपणे उभे होते. समाज आणि देशसेवेचा ध्यास आपसूकच मला पुन्हा उभे राहण्यास प्रेरित करे’

‘2018 मध्ये मी जून महिन्यात युपीएससीची पूर्व परीक्षा दिली आणि त्यामध्ये यशस्वी झाल्यानंतर डिसेंबरमध्ये होणाऱ्या मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले. फेसबुक, व्हॉटसअपचा टाईमपास टाळण्यासाठी साधा मोबाईल वापरला. मेसचे जेवण, दिल्लीचे दूषित वातावरण, जागरण त्यामुळे येणारा स्ट्रेस आणि आजारपणाचे घाव देखील ध्येयाप्रती असलेल्या माझा जिद्दीला आणि चिकाटीला थांबवू शकत नव्हते. चांगला अभ्यास झाल्यामुळे मुख्य परीक्षा पास होऊन मुलाखतीस पात्र झालो. मुलाखत युपीएससीचा धोलपूर हाऊस दिल्ली येथे होती. माझी मुलाखत साधारण अर्धातास चालली. मला एनएसएस, एनसीसी, कृषी, वनसंरक्षण अशा विविध विषयांवर प्रश्न विचारण्यात आले. मुलाखतीमध्ये तुमचे व्यक्तिमत्व तपासले जाते. तुमच्या ज्ञानापेक्षा तुम्ही कसे आहात हे तपासले जाते. आव्हानांना सामोरे जाण्याची तुमची तयारी आहे का, कठीण काळात तुम्ही शांतपणे योग्य विचार करू शकता का, तुमचा आत्मविश्वास खरेपणा हे पहिले जाते’

‘माझी मुलाखत मी आत्मविश्वासपूर्ण दिली. मुलाखत चांगली झाल्यामुळे निवड होईल असा आत्मविश्वास होता. 6 फेब्रुवारीला शेवटचा निकाल लागला आणि मी भारतात 71 वा आलो होतो. घरी आल्यानंतर गावात माझे जल्लोषात मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले. घरी आल्यानंतर घरच्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहून खूप समाधानी वाटले. पण आता खऱ्या अर्थाने माझी खरी परीक्षा सुरू झाली आहे. जे देश आणि समाजसेवेच स्वप्न उराशी बाळगून मी हा मार्ग निवडला होता तो पूर्ण करण्याची संधी मला आता मिळाली आहे’

‘माझे युवकांना एवढेच सांगणे आहे की आपल्याला आयुष्य हे एकदाच असते. त्यामुळे मोठे स्वप्न पहा आणि ते पूर्ण करण्यासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून द्या. या मार्गात आपल्याला अपयश अडचणी अशी बरीच संकटे येतील. पण आपण कुठेही खचून जाऊ नका. कारण देव अपयश अशाच लोकांना देतो जे मोठी स्वप्ने पाहतात आणि ज्यांचात ते अपयश पचवण्याचे सामर्थ्य असते. तेव्हा पुन्हा जिद्दीने आपल्या ध्येयाकडे वाटचाल करा. तुम्ही पूर्ण प्रयत्न केल्यानंतर तुम्हाला यश हे नक्की येते. “जहाँ प्रयत्नोंकी उँचाई अधिक होती है वहाँ नसिब को भी झुकना पडता है.” महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या स्वतःवर विश्वास आणि श्रद्धा ठेवा कारण तुम्ही आपल्या मनात स्वतःबद्दल जो विचार करता तसेच आपले व्यक्तिमत्व घडते. शेवटी हरिवंशराय बच्चन यांचा अग्निपथ या कवितेतील एक वाक्य जे मला कायम प्रेरित करत असते “तू ना थकेगा कभी, तू ना रुकेगा कभी, तू ना मुडेगा कभी, कर शपथ, कर शपथ, कर शपथ, अग्निपथ अग्निपथ अग्निपथ’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.