Chakan : कर्जदाराला जीवे मारण्याची धमकी देणा-या सहा खासगी सावकारांना अटक

एमपीसी न्यूज – खासगी सावकारांकडून लाखो रुपये व्याजाने घेतले. व्याजाचे पैसे वसूल करून देखील या सावकारांनी मिळून कर्जदाराला जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना रोहकल रोड, चाकण येथे घडली. याप्रकरणी चाकण पोलिसांनी सहा खासगी सावकारांना अटक केली आहे.

मंदार परदेशी, रंगा ठोंबरे, गारगोटे सर, अस्लम शेख, सचिन शेवकरी, दत्ता खेडकर (सर्व रा. चाकण) अशी अटक केलेल्या सावकारांची नावे आहेत. याप्रकरणी माधुरी विशाल सायकर (वय 25) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माधुरी यांचे पती विशाल यांनी 2017 साली मंदारकडून दरमहा आठ टक्के दराने पाच लाख रुपये, रंगा याच्याकडून दरमहा आठ टक्के दराने तीन लाख रुपये, गारगोटे याच्याकडून दरमहा पाच टक्के दराने पाच लाख रुपये, अस्लमकडून सात रुपये टक्क्यांनी सहा लाख रुपये, सचिन आणि दत्ता या दोघांकडून दहा रुपये टक्क्यांनी सहा लाख रुपये आणि महालक्ष्मी फायनान्सचे तीन लाख रुपये सहा रुपये टक्क्याने घेतले.

विशाल सायकर यांनी एकूण 28 लाख रुपये व्याजाने खाजगी सावकारांकडून घेतले. त्याचे व्याज त्यांनी दिले. तरीही सावकारांनी त्यांच्या दुकानावर येऊन तसेच फोनवरून पैशांबाबत तगादा लावला. शनिवारी (दि. 8) रात्री साडेदहाच्या सुमारास सायकर यांच्या घरात घुसून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत त्यांच्या पत्नी माधुरी यांनी चाकण पोलिसात तक्रार नोंदवली. चाकण पोलिसांनी सहा खासगी सावरकांना अटक केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.