Pimpri : पिंपरीतून ॲड. गौतम चाबुकस्वार यांना शिवसेनेची उमेदवारी जाहीर
एमपीसी न्यूज – पिंपरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांच्यावर विश्वास दाखवित पक्षाने पुन्हा एकदा त्यांना आज (रविवारी) उमेदवारी जाहीर केली.
मातोश्री येथे शिवसेनेच्या सर्व विद्यमान आमदारांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एबी फॉर्मचे वाटप केले. ‘पक्ष तुमच्या पाठिशी आहे, कामाला लागा, निवडून या’ असे म्हणत शिवसेना पक्ष प्रमुखांनी आमदारांना शुभेच्छा दिल्या.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार म्हणाले, मागील पाच वर्षातील केलेल्या विकासकामांची व कार्याची नोंद पक्षनेतृत्वाने घेतली व माझ्यावर विश्वास दाखविल्याबद्दल मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आभारी आहे.
आगामी काळात शहरातील जे प्रश्न मागील पाच वर्षात प्रलंबित राहिले, त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मी व्हिजन तयार केले आहे. त्यामध्ये एमआयडीसीच्या जागेवर असलेल्या सर्व झोपडपट्टयांचे पूर्नवसन करणे, डेअरी फार्म येथे उड्डाणपूल उभारणे, पिंपरी कॅम्पातील वाहतुकीचा प्रश्न निकाली काढणे, प्राधिकरणातील एलआयजीमधील नागरिकांनी केलेल्या वाढीव बांधकामांना नियमितीकरण करणे आणि दापोडी परिसराला स्मार्ट सिटीत घेण्यासाठी प्रयत्न करणे हा आपला अजेंडा राहणार आहे.