Chikhali : तरुणाच्या अपहरण प्रकरणी तिघांवर गुन्हा
एमपीसी न्यूज – कारमधून आलेल्या तीन जणांनी एका तरुणाचे अपहरण करीत त्यास मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 21) पहाटे साडेबाराच्या सुमारास चिंचवड येथे घडली.
रवींद्रकुमार रामकिशन छौवकर (वय 36, रा. शिवतेजनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तीन अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे रवींद्रकुमार हे चिखली येथून पायी चालले होते. त्यावेळी काळ्या रंगाच्या मोटारीतून आलेल्या आरोपींनी रवींद्रकुमार यांचे अपरहण केले. तसेच त्यांना मारहाण करून सोडून दिले. रवींद्रकुमार यांच्यासोबत काम करणारे संशयित विशाल गायकवाड, अभिजित बालघरे यांना कंपनीतून कमी केल्याच्या कारणावरून व फ्युचर मेकर लाइफ केअर ही नेटवर्क कंपनी बंद पडून कंपनीत गुंतविलेले पैसे फिर्यादी रवींद्रकुमार यांच्यामुळे बुडाल्याचा संशय घेऊन संशयित आरोपींनी हे कृत्य केल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.