Pimpri: पवना, इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी सल्लागारांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणार्‍या पवना व इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे डीपीआर बनविण्याचे काम गेल्या दोन वर्षापासून संथ गतीने सुरू आहे. असे असताना या प्रकल्पासाठी आता आणखी एक सल्लागाराची नियुक्त करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातून 24.4 किलोमीटर अंतर पवना नदी वाहते. या नदीचे पात्र दोन्ही बाजूने शहरात आहेत. तर, इंद्रायणी नदी 20.6 किलोमीटर अंतर वाहते. मुळा नदीचे पात्रही शहरातून वाहते. मात्र, त्याचा सुधार पुणे महापालिका करणार असून, त्याचा खर्च पिंपरी महापालिका अदा करणार आहे.

पवना व इंद्रायणी या दोन नद्याचा सुधार करण्यासाठी या प्रकल्पाच्या कामासाठी अहमदाबाद, गुजरातच्या एचसीपी डिजाईन प्लॅनिंग अ‍ॅण्ड मॅनेजमेंट प्रा. लि. या एजन्सीची नेमणूक केली आहे.

या प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करणे. सर्व आवश्यक परवानग्या घेणे आदी कामे ही एजन्सी करीत आहे. दोन वर्ष होत आली तरी, हे काम संथ गतीने सुरूच आहे. नदी सुधार प्रकल्प उभारणी व देखभालीसाठी एकूण 100 स्थळांची पाहणी करण्यात येणार आहे.

कामाच्या मोबदल्यात पालिका एचसीपी एजन्सीला एकूण किमतीपैकी 25 टक्के रक्कम 5 समान टप्प्यामध्ये अदा करणार आहे. पवना नदीसाठी 2 कोटी 70 हजार आणि इंद्रायणी नदीसाठी 1 कोटी 78 लाख 40 हजार असे एकूण 3 कोटी 79 लाख 10 हजार रुपये शुल्क अदा केले जाणार आहे. त्यास स्थायी समितीने जून 2018 ला मंजुरी दिली आहे.

डीपीआर तयार झाल्यानंतर प्रत्यक्ष देखभाल व दुरूस्ती कामासाठी युनिटी आयईवर्ल्ड या एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या एजन्सीला निविदा कामांच्या 1.25 टक्के शुल्क अदा केले जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.