Pimpri: महापालिकेचे ‘येस’ बँकेत अडकलेले 984 कोटी दोन दिवसात मिळणार – श्रीरंग बारणे

केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांची खासदार श्रीरंग बारणे यांनी घेतली भेट

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कररुपी गोळा झालेले तब्बल 984.26 कोटी रुपये खासगी क्षेत्रातील येस बँकेत अडकले आहेत. महापालिकेचे हे पैसे तातडीने देण्याची मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांची आज (मंगळवारी) भेट घेऊन केली. त्यावर बँकेवरील निर्बंध उठविण्यात येणार असून, दोन दिवसात पिंपरी महापालिकेचे पैसे मिळतील, असे आश्वासन ठाकूर यांनी दिल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.

येस बँकेची आर्थिक स्थिती खालावत असल्याने भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) येस बँकेवर गुरुवारपासून (दि.5 मार्च) निर्बंध लागू केले आहेत. तसेच बँकेवर प्रशासकाची नियुक्ती केली आहे. या निर्बंधांमुळे पिंपरी महापालिकेचे कररुपातून गोळा झालेले तब्बल 984.26 कोटी रुपये बँकेत अडकले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी आज संसद भवनात केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी महापालिकेचे अडकलेले पैसे तातडीने देण्याची विनंती केली.

खासदार बारणे म्हणाले, येस बँक देशातील सर्वांत मोठी खासगी बँक आहे. या बँकेवर निर्बंध आल्याने प्रशासक नेमला आहे. बँकेतील पैसे काढण्यावर बंधने घातली आहेत. खातेधारकाला केवळ 50 हजार रुपयेच काढता येत आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. याशिवाय पिंपरी-चिंचवड महापालिकेचे देखील तब्बल 984.26 कोटी रुपये बँकेत अडकले आहेत. हा पैसा जनतेच्या करातून जमा झालेला आहे. त्यामुळे महापालिकेचे पैसे तातडीने अदा करण्याचे निर्देश आरबीआयला देण्याची विनंती केली.

त्यावर बँकेवरील निर्बंध उठविण्यात येणार आहेत. दोन दिवसात पिंपरी महापालिकेचे पैसे मिळतील. तुम्ही निश्चित रहा, असे आश्वासन अर्थराज्यमंत्री ठाकूर यांनी दिल्याचे खासदार बारणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.