Pimpri : नदी संवर्धनासाठी महापालिका प्रशासनाच्या तांत्रिक अडचणी समजून घेण्यास तयार – विकास पाटील

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवडमधील नदी संवर्धन या मुख्य समस्येला आजपर्यंत सोयीस्करपणे निरनिराळी कारणे समोर करून मोठ्या चतुराईने राजकीय व प्रशासकीय विभागाकडून चालढकल करण्यात आली. तसेच या विषयाला 2000 सालापासून प्रलंबित ठेवण्यात आले. या बाबत मनपा प्रशासनाच्या तांत्रिक बाजू समजून घेवून त्यातून सुवर्णमध्य ठरविण्यासाठी पुढाकार घेण्यास तयार असल्याचे पर्यावरणतज्ज्ञ विकास पाटील यांनी सांगितले आहे.

आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात पाटील म्हणतात, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहकार्याने फेब्रुवारीमध्ये शहरात ‘पर्यावरण साहित्य संमेलनाचे’ आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात 25 मुद्दे चर्चेत घेतले होते. त्यामध्ये, पर्यावरण प्रेमी नागरिकांचा व प्रसार माध्यमांचा आक्रोश नदी संवर्धनासाठी हा एक महत्त्वाचा विषय होता. नदी काठच्या जागांची मालकी व त्यासाठी सरकारी आदेश आणि मनपा कडून झालेली जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया या बाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचना मनपा नगर विकास विभागाला प्राप्त झाल्या आहेत. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व आर्थिक तरतूद सुद्धा वार्षिक नियोजनात झालेली असताना नगर विकास विभाग अधिकारी कोणत्या मुहूर्ताची वाट पाहत आहेत असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला आहे.

पाटील पुढे म्हणाले, इंद्रायणी, पवना आणि मुळा नदी च्या बाजूची किती जागा आता पर्यंत महापालिकेने ताब्यात घेतली आहे व उर्वरित संपूर्ण जागा ताब्यात घेण्या बाबत आपली अंतिम कालमर्यादा काय ठरली आहे ते पिंपरी चिंचवड च्या सामान्य जनतेला आपल्या कार्यालया मार्फत अधिकृतपणे कळणे आपेक्षित आहे. या विषयावर शहरातील काही तज्ञ मंडळींना घेऊन नदी संवर्धनाच्या मुलभूत अडचणी बद्दल भेटण्याची इच्छा पाटील यांनी पत्राद्वारे व्यक्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.