Pimpri: नालेसफाईचे काम सुरु; 15 मे पर्यंत काम पुर्ण होणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांना पावसाळ्यामध्ये कोणताही त्रास होऊ नये यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने नालेसाफसफाईचे काम सुरु केले आहे. 30 ते 40 टक्के सफाईचे काम झाले आहे. 15 मे पर्यंत नालेसफाई पुर्ण करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर यंदा सफाईच्या कामाला लवकर सुरुवात करण्यात आली आहे. याबाबतची माहिती सभागृह नेते नामदेव ढाके आणि आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड शहर परिसरात छोटे – मोठे मिळून 152 नाले आहेत. त्यामध्ये ‘अ’ प्रभागात 25, ‘ब’ 13, ‘क’ 33, ‘ड’ 12, ‘ई’ 21, ‘फ’ 15, ‘ग’ 9 आणि ‘ह’ प्रभागात 24 नाले आहेत. महापालिकेच्या वतीने बांधलेल्या नाल्यांची (बांधीव नाले) वर्षभर साफसफाई केली जाते. उर्वरित नाल्यांची पावसाळ्याच्या अगोदर साफसाफई केली जाते. महापालिकेकडून पावसाळ्यापुर्वी शहरातील नालेसफाईची कामे केली जातात. दरवर्षी मे महिन्यात साफसाफई केली जाते. परंतु, यंदा कोरोनाच्या पार्श्वभुमीवर नाल्यांची साफसाफई मोहिम लवकरच हाती घेण्यात आली. 30 ते 40 टक्के सफाईचे काम झाले आहे.

सभागृह नेते नामदेव ढाके म्हणाले, सद्या अवकाळी पावसाची शक्यता आहे. शहरात नाल्यांची आणि स्टॉर्म वॉटर चेंबर, लाईनची पावसाळ्यापूर्वी साफसफाई करण्याची आवश्यकता आहे. त्यानुसार प्रशासनाने साफसफाईचे काम हाती घेतले आहे. शहरातील नाल्यांचे कॉँक्रीटीकरण झाले आहे. काही नाल्यांमध्ये कचऱ्याचे ढीग लागले आहेत. झाडांच्या फांद्या, वाढलेले गवत, चेंबरवर नसलेले झाकण, तर काही ठिकाणी टाकलेला मातीचा भराव यामुळे येत्या पावसाळ्यात पावसाच्या पाण्याला अडथळा होऊन रस्त्यावर तळे निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्टॉर्म वॉटर लाइनच्या चेंबर तसेच नाल्यामध्ये माती व कचरा पडल्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावरचे पाणी वाहून जाण्यासाठी अडथळा निर्माण होतो.

त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर साचून घाणीचे साम्राज्य व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवु नये यासाठी पावसाळ्यापूर्वी सर्व स्टॉर्म वॉटर लाइनचे चेंबर व सर्व नाल्यांची साफसफाईच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे.

आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहरात 152 नाले आहेत. नालेसफाईच्या कामाला सुरुवात केली आहे. 30 ते 40 टक्के साफसफाईचे काम झाले आहे. तर, काही नाल्यांच्या साफसफाईला सुरुवात केली नाही. त्यासाठी पोकलेन आणि जीसीबी लागणार आहे. त्यासंदर्भात स्थापत्य विभागाला पत्र दिले आहे. पोकलेन आणि जीसीबी उपलब्ध होताच त्याच्या कामाला सुरुवात केली जाईल. 15 मे पर्यंत नालेसफाईचे काम पुर्ण केले जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.