Bhosari News: भोसरीतील रोहित्राच्या स्फोटाची चौकशी सुरु; मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाखांची मदत

राज्य शासनाच्या विद्युत निरीक्षकांकडून या विद्युत रोहित्राच्या स्फोटाची चौकशी सुरु करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशी अहवालानुसार महावितरणच्या संबंधीत दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

एमपीसी न्यूज – भोसरी येथील इंद्रायणीनगरमध्ये विद्युत रोहित्राच्या स्फोटप्रकरणी राज्य शासनाच्या जिल्हा विद्युत निरीक्षकांकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे. त्यांच्या निरीक्षण अहवालाप्रमाणे महावितरणचे दोषी अधिकारी व कर्मचारी तसेच संबंधीत रोहित्र पुरवठादार एजन्सीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तिन्ही मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे.

भोसरी येथील इंद्रायणीनगरमध्ये राजवाडा बिल्डींग 2 जवळ विद्युत रोहित्राचा शनिवारी (दि. 4) दुपारी दीड वाजताच्या सुमारास स्फोट झाला. या दुर्दैवी घटनेत शारदा दिलीप कोतवाल, हर्षदा सचिन काकडे व त्यांची 5 महिन्यांची मुलगी यांचा मृत्यू झाला. मृतांच्या कुटुंबीयांना महावितरणकडून प्रत्येकी चार लाखांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे.

राज्य शासनाच्या विद्युत निरीक्षकांकडून या विद्युत रोहित्राच्या स्फोटाची चौकशी सुरु करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशी अहवालानुसार महावितरणच्या संबंधीत दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे. यासोबतच महावितरणकडून देखील तीन सदस्यीय समिती या स्फोटाची अंतर्गत चौकशी करीत आहे.

तसेच महावितरणकडून संबंधीत अधिकाऱ्यांना स्फोटप्रकरणी तात्काळ कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. स्फोट झालेले विद्युत रोहित्र काही तासांपूर्वीच बसविण्यात आले होते. हे रोहित्र पुरवठा करणाऱ्या एजन्सीला देखील कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.