Maval News: गावचा विकास करण्यासाठी हेवेदावे बाजूला ठेवून निवडणुका बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करावेत -आमदार सुनील शेळके

एमपीसी न्यूज – गावचा विकास करण्यासाठी हेवेदावे बाजूला ठेवून ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन आमदार सुनील शेळके यांनी केले.

मावळ तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची मावळ आढावा बैठक गुरूदत्त मंगल कार्यालय कामशेत येथे शनिवार दिनांक 2 रोजी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आमदार शेळके बोलत होते. त्यावेळी पक्षाचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, महिला अध्यक्ष सुवर्णा राऊत, सुभाष जाधव, विठ्ठल शिंदे, अर्चना घारे, नामदेव दाभाडे, नारायण ठाकर, कैलास गायकवाड, सुनिल दाभाडे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

बबनराव भेगडे, विठ्ठल शिंदे यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.

आमदार शेळके म्हणाले की, कोरोना महामारी व नैसर्गिक आपत्तीमुळे आपल्याला अनेक संकटांचा सामना करावा लागला आहे. ग्रामीण भागातील गाव पातळीवरील समीकरणे वेगळी असतात. त्यामुळे गावातील हेवेदावे बाजूला ठेवून गावाच्या विकासासाठी व हितासाठी स्थानिक पातळीवर ग्रामस्थांनी एकत्र येऊन चर्चा करावी. गावात असलेला राजकीय वाद गट-तट संपुष्टात आणण्यासाठी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करावेत आणि बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतीला अकरा लाखांचा विकास निधी देण्यात येईल असे आवाहन यापूर्वी मी केले होते. यावर अनेक ग्रामपंचायतीने चांगला प्रतिसाद दिला आहे.

गावातील तंटे कमी झाले पाहिजे. गावात एकोपा, शांतता निर्माण झाली पाहिजे. आपल्या गावचा आदर्श इतरांनी घेतला पाहिजे हा त्यामागचा मूळ उद्देश आहे. परंतु अजूनही काही जण यात राजकारण आणून वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. राजकारण करून गावपण बिघडवण्यापेक्षा विकासाला प्राधान्य द्या, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष सुभाष जाधव यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेवक चंद्रजीत वाघमारे यांनी केले.

उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अजून दोन दिवसांचा कालावधी आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामशेत येथील आढावा बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.