दिघीत जुन्या नोटा असलेले दीड कोटी रुपये पकडले

एमपीसी न्यूज – चलनातून बाद झालेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा असलेले 1 कोटी 36 लाख 26 हजार रुपये बदलून घेण्यासाठी जाणा-या तिघांना दिघी पोलिसांनी पकडले आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.24) रात्री आठच्या सुमारास दिघीतील मॅकझीन चौकात करण्यात आली आहे. 

पोलिसांनी रोकड आयकर विभागाकडे सुपूर्द केली असून आयकर विभागाचे अधिकारी तपास करत आहेत. पोलिसांनी तिघांना आयकर कार्यालयात  हजर राहण्याची नोटीस देऊन सोडून दिले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री दिघी पोलीस हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी मॅकझीन चौकात एक ‘इनोव्हा’ मोटार संशायास्परित्या फिरत होती. त्यामुळे पोलिसांनी  मोटारीची झडती घेतली असता मोटारीत जुन्या नोटा असलेले 1 कोटी 36 लाख 26 हजार रुपये सापडले. पोलिसांनी तिघांना आणि एक चालकाला ताब्यात घेतले. चालक भोसरी येथील रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडील रोकड जप्त करुन  त्यांना आयकर विभागाकडे हजर राहण्याची नोटीस देऊन सोडण्यात आले आहे. 
 

पैसे बदलून घेण्यासाठी ते इनोव्हा मोटारीतून जात होते. रस्त्यामध्ये एकजण त्यांना भेटणार होता, असेही पोलिसांनी सांगितले. याबाबत आयकर विभागाला माहिती दिली. आयकर विभागाच्या अधिका-यांकडे रोकड जमा करण्यात आली असून पैसे कोणाचे होते, कोठून आणले होते, कोणाकडून बदलून घेणार होते, याचा आयकर विभागाचे अधिकारी तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.