स्वाभिमानी रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे यांच्या पुतण्यांवर प्राणघातक हल्ला

एमपीसी न्यूज – स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे यांचे पुतणे व मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक नितिन रतन साळवे व कुसगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रविण रतन साळवे यांच्यावर लोणावळ्याजवळील ओळकाईवाडी चौकात मंगळवारी (दि.28) रात्री साडेअकराच्या सुमारास प्राणघातक हल्ला झाला. यामध्ये साळवे यांचे दोन्ही पुतणे बचावले असले तरी नितिन साळवे यांच्या डोक्याला मार लागला आहे. 
 
 
नितिन साळवे यांच्या फिर्यादीवरुन लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
मावळ पंचायत समितीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. त्यामध्ये शिवसेनेच्या वतीने उषा संजय घोंगे या उमेदवार होत्या तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राजश्री संतोष राऊत या उमेदवार होत्या. सदर निवडणुकीत स्वाभिमानी पक्षाने राष्ट्रवादी पक्षाला पाठिंबा दिला होता व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे हे प्रचारप्रमुख होते. सदर निवडणुकीत राजश्री राऊत विजयी झाल्या व शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला हा राग मनात धरुन शिवसेनेचे रवी घोंगे व गबळू ठोंबरे हे रमेश साळवे यांच्या सोबत ओळकाईवाडी चौकात वाद घालत होते. ही माहिती मिळताच साळवे यांचे पुतणे नितिन व प्रविण हे चौकात आले असता कुसगाव ग्रामपंचायत सदस्य गबळू ठोंबरे, रवी घोंगे, किसन ठोंबरे, बाळू काळे, अमोल ठोंबरे, बाळा ठोंबरे, अजित केदारी, मनोज केदारी, विजय घोंगे व इतर यांनी काठ्या, चाकूने वार करत मारहाण केली तर गबळू ठोंबरे यांनी त्यांच्या हातातील तलवारीने नितिन साळवे यांच्या डोक्यात वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला व इतरांनी प्रविणला मारहाण केली. यावेळी रमेश साळवे यांना गाडीत बसविले असता आरोपींनी गाडीवर मागासवर्गीय जातीचे म्हणून शिविगाळ करत हल्ला केला असल्याचे फिर्यादी मध्ये म्हटले आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.