Wakad: फेसबुकवरुन घेतला नंबर; मुलीचे अपहरण करण्याची धमकी देत मागितली खंडणी; दोन अभियंत्यांना ठोकल्या बेड्या

एमपीसी न्यूज – दोन उच्चशिक्षित तरुणांनी वाकड येथील एका बड्या व्यावसायिकाच्या कुटुंबाची फेसबूकवरुन माहिती घेतली. त्याच्या पत्नीला फोन करुन मुलीला पळवून नेण्याची धमकी देत पाच लाखाची खंडणी मागणा-या दिल्लीतील दोन उच्च शिक्षित आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी वेषांतर करून आरोपींना आज ( शनिवारी) काळेवाडी परिसरातून जेरबंद केले.

रोहित विनोद यादव (वय 28, रा. प्रेमनगर, नझमगड नवी दिल्ली)आणि अभिनव सतिश मिश्रा (वय 27, रा. लखनौ, उत्तरप्रदेश)असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघांचेही बी.टेक झाले त्यांचे शिक्षण पुण्यात झाले आहे.

वाकड परिसरातील एका उच्चभ्रु सोसायटीमध्ये एका व्यावसायिकाचे कुटुंब राहत आहे. तर, आरोपी रोहित आणि अभिनव यांचे पुण्यात बी.टेकचे शिक्षण झाले आहे. आरोपी रोहित याला व्यावसायिकाच्या कुटुंबाची माहिती होती.
या व्यावसायिकाच्या पत्नीच्या फेसबुक खात्यावरुन  आरोपींनी मोबाईल नंबर घेतला. बुधवार (दि.19) दुपारी चारपासून आरोपींनी व्यावसायिकाच्या पत्नीला सार्वजनिक दुरध्वनीवरुन फोन करण्यास, मॅसेज पाठविण्यास सुरुवात केली. पाच लाखाच्या खंडणीची मागणी करत खंडनी न दिल्यास 15 वर्षाच्या मुलीचे अपहरण करण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या कुटुंबियांनी पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली.

त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला. आरोपी कानपूर, दिल्लीतून फोन करत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. आरोपींनी महिलेला आज (शनिवारी)लोहगाव विमानतळावर पैसे घेऊन येण्यास सांगितले. तथापि, विमानतळावर गर्दी असल्याने आरोपींना अधिक पैशांचे आमिष दाखवत वाकड परिसरात बोलविले. डी.पी.बॉक्सच्या पाठीमागे खंडणीची रक्कम ठेवण्यास आरोपींनी सांगितले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला होता. वेषांतर करत पोलीस तैनात होते. आरोपी पैसे ठेवलेल्या परिसरात आले. परंतु, त्यांने पैसे उचलले नाहीत. ते संशयितरित्या घुटमळत असल्याने पोलिसांनी आरोपी रोहित आणि अभिनव याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे, पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

आर.के. पद्मनाभन म्हणाले, ‘आरोपींनी फेसबुकवरुन मोबाईलनंबर घेतले होता. आरोपी रोहित याचे पुण्यात शिक्षण झाले. त्यामुळे त्याला महिलेच्या कुटुंबाची माहिती होती. महिलेची 15 वर्षाची मुलगी कोठे नोकरी करते, कधी येते, याची सविस्तर माहिती आरोपींना होती. महिलेला फोन करुन आरोपींनी  पाच लाख रुपये खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास मुलीचे अपहरण करण्याची धमकी दिली होती. आरोपींचे बी.टेक झाले असून त्यांनी दिल्लीत नोकरी केली आहे. सध्या ते कोठेही नोकरी करत नाहीत. त्यांनी अशाप्रकारे आणखीन काहीजणांना खंडणी मागितली असल्याची शक्यता असून त्यादृष्टीने तपास सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.