Pune : स्वारगेट येथून तब्बल पाच हजार किलोचा भेसळयूक्त खवा जप्त

एमपीसी न्यूज –  खाजगी प्रवासी बसमधून विक्रीसाठी आणलेला तब्बल पाच हजार किलोचा भेसळयूक्त खवा पोलिसांनी सापळा रचून जप्त केला. ही कारवाई काल शुक्रवारी (दि.21) रात्री दहाच्या दरम्यान स्वारगेट येथील पौर्णिमा टॉवर येथे करण्यात आली. 

याप्रकरणी चालक हिंमतसिंग गोपालसिंग राठोड (वय 45, रा.अहमदाबाद) व इतर दोघांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वारगेट येथे गस्त घालत असताना पोलीस कर्मचारी शंकर संपते यांना स्वारगेट येथील पौर्णिमा टॉवर येथे खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसमध्ये भेसळयूक्त खवा विक्रीसाठी आणणार असल्याची माहिती खबऱ्या मार्फत मिळाली होती. त्यानुसार ही माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवून त्यांच्या मदतीने पौर्णिमा टॉवर येथे सापळा रचून पोलिसांनी निता ट्रॅव्हल्स या खाजगी प्रवासी बसमध्ये झडती घेतली असता बसमध्ये त्यांना तब्बल 4 हजार 852 किलो भेसळयूक्त खवा मिळाला.

चाचणी करण्यासाठी खव्याचा सॅम्पल औषध व प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी काढून घेऊन सर्व खवा जप्त केला आहे. या प्रकरणी खव्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या चालका विरुद्ध कारवाई करण्यात आली असून निता ट्रॅव्हल्सची बसही ताब्यात घेतली आहे. गणेशोत्सव निमित्ताने व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार भेसळयुक्त खवा पुणे, नागपूर व हैदराबाद या ठिकाणी विक्रीसाठी आणले असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. स्वारगेट पोलीस अधिक तपास करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.