Pune : बेगम परवीन सुलताना यांच्या सुश्राव्य गायनाने रंगला सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव

66 व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला प्रारंभ

एमपीसीए न्यूज- ज्येष्ठ शास्त्रीय गायिका बेगम परवीन सुलताना यांच्या सुश्राव्य सुरावटींनी सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा समारोप झाला. बुधवारी (दि. 12) पुण्यात महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुलामध्ये 66 व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. कल्याण अपार यांच्या सनईवादनाने महोत्सवाची सुरुवात झाली.

बेगम परवीन सुलताना यांनी आपल्या गायनाची सुरूवात राग ‘जोग’ने केली. त्यांनी सादर केलेल्या बडा ख्याल व छोटा ख्यालला श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला. आपल्याला मोठ्या भावासारखा जीव लावणारे आणि तानपुरा मिळवून देण्यापासून कायम मदतीसाठी पुढे होणारे पं. भीमसेन जोशी यांचे स्मरण करत बेगम परवीन सुलताना यांनी त्यांच्या काही आठवणी सांगितल्या. पुण्यासारखा जाणकार श्रोता दुर्मिळच, असे म्हणत त्यांनी पुणेकर रसिकांचे कौतुकही केले.

त्यांना पं. मुकुंदराज देव (तबला), पं. श्रीनिवास आचार्य (हार्मोनियम), विद्या जाईल, शादाब सुलताना खान आणि सचिन शेटे (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

त्यांच्या आधी प्रसिद्ध शास्त्रीय गायक प्रसाद खापर्डे यांनी राग केदार सादर केला. त्यांनी सादर केलेल्या ‘राम भजो भाई’ या भजनालाही रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यांना पं. रामदास पळसुले (तबला), मिलिंद कुलकर्णी (हार्मोनियम), ह्रषिकेश शेलार, शिवाजी चामनर (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.