Pimpri : महापालिकेच्या विकास योजनेचा नकाशा नागरिकांसाठी खुला होणार 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मंजूर विकास योजना सुधारित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. विकास योजनेचा सुधारित इरादा महापालिका जाहीर करणार आहे. या विकास योजनेत समाविष्ट असलेल्या क्षेत्राच्या हद्दी दर्शवणारा नकाशा नागरिकांसाठी खुला करण्यात येणार आहे. नागरिकांच्या अवलोकनासाठी महापालिका कार्यालयात नकाशा ठेवण्यात येणार आहे.  त्यावर नागरिकांच्या हरकती, सूचना मागविण्यात येणार आहेत. तातडीची बाब म्हणून याबाबतचा प्रस्ताव आज (मंगळवारी) महासभेसमोर आयत्यावेळी दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी महापालिकेची मंजूर विकास योजना सुधारित (दुस-यांदा) करण्याकरिता नगररचना उपसंचालक यांच्या अधिपत्याखालील विकास योजना विशेष घटक कार्यालय पिंपरी महापालिका आणि – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण या अभिनामाने स्थापना झाला आहे. महापालिकेची मंजूर विकास योजना सुधारित करण्यासाठी सर्वेक्षण करणे. जमीन वापर नकाशा व इतर कामे खासगी संस्थेमार्फत करुन घेण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यास महासभेने 21 नोव्हेंबर 2013 रोजी मान्यता दिली आहे. महापालिकेच्या संपुर्ण क्षेत्राची (जुन्या व वाढीव हद्दीसाठी) विकास योजना तयार करण्याचा ठराव 5 फेब्रुवारी 2018 रोजी महासभेने मंजूर केला आहे. त्यानुसार निविदा कार्यवाही करुन खासगी संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. या संस्थेस 8 मार्च 2019 रोजी कामाचा आदेश दिला आहे.

महाराष्ट्रा प्रादेशिक व नियोजन नगररचना अधिनियम 1966 चे कलम 23 ते 31 प्रामुख्याने सुधारित विकास योजना करण्याशी निगडीत आहेत. त्यानुसार महापालिकेला मंजूर विकास योजना सुधारित करण्याबाबतचा इरादा जाहीर करणे आवश्यक आहे. या विकास योजनेत समाविष्ट असलेल्या क्षेत्राच्या हद्दी दर्शवणारा नकाशा नागरिकांसाठी खुला करण्यात येणार आहे. महापालिकेच्या कार्यालयात नागरिकांच्या अवलोकनासाठी नकाशा ठेवण्यात येणार आहे.  त्यावर नागरिकांच्या हरकती, सूचना मागविण्यात येणार आहेत.  60 दिवसाच्या कालावधीत प्राप्त होणा-या नागरिकांच्या सूचना, हरकतींचा विकास योजना करताना विचार केला जाणार आहे. सुधारित विकास योजना तयार करण्याचा महापालिकेचा इरादा सरकारच्या राजपत्रात आणि वृत्तपत्रात प्रसिद्ध केला जाणार आहे.

त्याचबरोबर विकास योजनेचे सर्व वैधानिक कामकाज करण्याकरिता महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 24 नुसार महापालिका आणि प्राधिकरणाच्या उपसंचालकांची नगररचना अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. मंजूर विकास योजना सुधारित करण्याची सर्व वैधानिक कार्यवारी करण्यास महापालिका आयुक्तांना प्राधिकृत करण्यास, त्याअनुषांगिक येणा-या खर्चास मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव महासभेसमोर दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.