AAP : वीज दरवाढीविरोधात आपचे आंदोलन

एमपीसी न्यूज – दोन दिवसांपूर्वी महावितरणने व इतर खासगी वीज कंपन्यांनी  जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरोधात आम आदमी पार्टी आज (शुक्रवारी) राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. पिंपरी-चिंचवड शहर आम आदमी पार्टीनेही (AAP) आकुर्डीत आंदोलन केले. वीज दरवाढ मागे घेण्याची मागणी केली. त्याबाबतचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.

 Bhosari Crime: गांजा सेवन करणाऱ्या एकास अटक

 

 

कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात ज्योती शिंदे, स्मिता पवार ,महेश गायकवाड, वहाब शेख, प्रकाश हगवणे, संतोषी नायर, स्वप्निल जेवळे, विजय अब्बाड, गोविंद माळी, सरोज कदम, राज चाकणे, ब्रह्मानंद जाधव, मीना जावळे, जावळे मामा, आशितोष शेळके, यशवंत कांबळे, वैजनाथ शिरसाठ, अशोक तनपुरे, आदिनाथ सकट, संतोष कुमार गायकवाड, अजित सिंह , चंद्रकांत हुंबरे आदी सहभागी झाले होते.

 

 

या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः 20 टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे. 100 ते 300 युनिट पर्यंत एका युनिट मागे 1 रुपये 45 पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे. त्यामुळे ज्यांना 1 हजार रुपये बिल येत होते. त्यांना 1 हजार 200 रुपये बिल येईल.  लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ यामुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्यावी, अशा मागणीची निवेदने मुख्यमंत्र्यांच्या नावे स्थानिक तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आले.

वीजदरवाढीसाठी आंदोलने करणा-यांनीच दरवाढ केली

‘महावितरण कडून लॉकडाऊन काळात 1 एप्रिल 2020 पासून 20% वीज दर वाढ करण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज महाराष्ट्रात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ 20 टक्क्यांपर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आहे. शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील जनतेला वचन दिले होते की आमचे सरकार आल्यास आम्ही 300 युनिटपर्यंतची घरगुती वापरासाठीची वीज 30%  स्वस्त देवू. तसेच भाजपकडून विविध राज्यातील निवडणूक जाहीरनाम्यात 100 ते 200 युनिट वीज मोफत देण्याचे जाहीर केले आहे.

 

एवढेच नव्हेतर महाविकासआघाडी सरकार असताना मागच्या दोन वर्षात भाजप व स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी वीज दरवाढ कमी करणे, मोफत वीज देण्याबाबत अनेक वेळा रस्त्यावर येवून आंदोलन केली आहेत. आता वचन देणारे शिवसेना नेते आणि वीज दर कमी करण्याची मागणी करणारे भाजप सत्तेवर आल्याने आता जनतेला दिलासा देण्याची संधी त्यांना आहे. दरवाढ मागे घ्यावी. त्याशिवाय 30 टक्के सवलत देत खरे शिवसैनिक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी दाखवून द्यावे,  असे आवाहन आम आदमी पार्टीचे अध्यक्ष रंगा राचुरे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.