Pimpri : महापौरांप्रमाणे वागा, दुजाभाव करु नका; विरोधी पक्षनेत्याने खडसावले

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा ढोरे सभागृहात दुजाभाव करत आहेत. भाजपचे नगरसेवक विषयाला सोडून बोलत असताना महापौर त्यांना काहीच बोलत नाहीत. राष्ट्रवादी, शिवसेनेचे नगरसेवक बोलताना त्यांना थांबविले जाते. महापौर कोणत्या पक्षाच्या नसतात. शहराच्या असतात असे खडेबोल सुनावत विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी  महापौर आहात ना मग महापौरांप्रमाणे वागा असा सल्ला महापौरांना दिला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची फेब्रुवारी महिन्याची महासभा आज (गुरुवारी) झाली. महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. या सभेत महिला अत्याचार, वाढती गुन्हेगारी यांवर चर्चा करत भाजप नगरसेवकांनी राज्य सरकारवर टीका केली. तर, विरोधकांनी दिल्लीतील निर्भयाच्या आरोपींना फाशी होत नसल्याने केंद्र सरकारवर, भाजप आमदार राम कदम यांच्यावर टीकास्त्र सोडले.

भाजप नगरसेवक राज्य सरकारवर तर राष्ट्रवादी, शिवसेनेचे नगरसेवक केंद्र सरकारवर टीका करत होते. त्यामुळे सभागृहात नगरसेवकांमध्ये मतभेद होत होते. भाजप नगरसेवक राज्य सरकारवर टीका करायला लागले की राष्ट्रवादी, शिवसेनेचे नगरसेवक विरोध करत होते. तर, विरोधक केंद्र सरकारवर टीका करायला लागले की भाजप विरोध करत होते. भाजप नगरसेवक विरोधकांच्या भाषणात अडथळा आणताना महापौर त्यांना रोखत नव्हत्या.

विरोधी पक्षनते नाना काटे यांनी महापौर दुजाभाव करत असल्याचा आरोप सभेत केला. सत्ताधारी नगरसेवकांना महापौर विषयाला सोडून बोलून देतात. मात्र, विरोधक बोलत असताना त्यांना थांबवतात. खाली बसायला सांगतात. महापौर एका पक्षाच्या नसून शहराच्या आहेत. महापौरांनी भाजपच्या नगरसेवकांना देखील खाली बसायला सांगायला पाहिजे. महापौर आहात ना मग महापौरांप्रमाणे वागा असा सल्लाही त्यांनी दिला.

त्यावर विरोधक आहेत. आरोप करणारच अशी प्रतिक्रिया महापौर उषा ढोरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.