Pimpri : खेचाखेचीनंतर ‘राजदंडाला’ सुरक्षाकवच, भाजपकडून सभाशास्त्राचे नवे पायंडे; विरोधकांचा आरोप

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका सभागृहातील महापौरांच्या आसनासमोरील राजदंड विरोधकांनी उचलल्यामुळे मागील सभेत भाजपवर सभा तहकुबीची नामुष्की ओढाविली होती. त्यासाठी खबरदारी म्हणून आमदारद्वियांच्या निर्देशानुसार महापौरांच्या हौदासमोरील फर्निचरची रचना बदलली आहे. नगरसेवकांना राजदंडाला हात लावता येणार नाही, अशी रचना करण्यात आली आहे. दरम्यान, भाजपकडून सभाशास्त्राचे नवे पायंडे पाडले जात आहेत. भाजप संसदीय आयुधांचा वापर करु देत नाही. विरोधकांचा आवाज दाबत असल्याचा आरोप शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी केला.

अनुभवी असलेल्या उषा ढोरे महापौर झाल्यापासून महासभेत गोंधळ सुरु आहे. महापौरांची कामकाजाची पहिलीच सभा तहकूब झाली होती. दुसरी सभा देखील गोंधळातच तहकूब झाली होती. मागील काही सभा गोंधळातच पार पडत आहेत. महापालिकेची निवडणूक दोन वर्षांवर येऊन ठेपल्याने भाजप नगरसेवकांमधील मतभेद उफाळून येत आहेत. त्यातच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपसूचना स्वीकारायच्या नाहीत असा आदेश दिला आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजप नगरसेवकांमध्ये अस्वस्थता आहे. अस्वस्थेतून सत्ताधारी कसलेही निर्णय घेत आहेत. आता सभागृहात पक्षीय बळानुसार नगरसेवकांची आसन व्यवस्था केली जाणार असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

महापौर ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली सन 2019 मधील डिसेंबर महिन्याची तहकूब 6 जानेवारी रोजी झाली. या सभेत शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी महापौरांसमोरील राजदंड उचलला होता. भाजपवर सभा तहकुबीची नामुष्की ओढाविली होती. त्यामुळे खबरदारी म्हणून भाजपने महापौरांच्या हौदासमोरील फर्निचरची रचनाच बदलली आहे. नगरसेवकांना मानदंडाला हात लावताच येणार नाही, अशी रचना करुन घेतली आहे. त्यामुळे विरोधकांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.

शिवसेना गटनेते राहुल कलाटे म्हणाले, महापौरांसमोरील हौदात अचानक बदल केला आहे. सत्ताधा-यांच्या सुपिक डोक्यातून ही कल्पना आली आहे. संसदीय आयुधाचा वापर करत विरोधक मानदंड उचलतात. आपल्या मागणीकडे सत्ताधा-यांचे लक्ष वेधतात. संसदीय लोकशाहीत हे महत्वाचे आयुध आहे. परंतु, भाजपकडून संसदीय आयुधांना छेद दिला जात आहे. मानदंडापर्यंत पोहचू नये अशी रचना केली आहे. महिला महापौर उषा ढोरे यांच्या माध्यमातून विरोधकांचा आवाज दाबण्याचा घाट आमदारांकडून घातला जात आहे. सत्ताधारी विरोधकांचा आवाज दाबत आहेत. शहराबरोबर सभागृहात देखील भाजपची दादागिरी वाढली आहे. आता नव्याने सभागृहात बैठक व्यवस्था केली जाणार आहे. त्याला आमचा विरोध आहे.

महापौर उषा ढोरे म्हणाल्या,  राजदंड पळवू नये यासाठी मी स्वत: उभे राहून फर्निचरचे काम करुन घेतले आहे. राजदंड चमकला पाहिजे. चांगला दिसायला पाहिजे. त्याला चकाकी असावी यासाठी हा बदल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like