Pune News : अतिरिक्त आयुक्त पहाटे करणार आरोग्य कोठ्यांची तपासणी!

एमपीसी न्यूज : शहरातील स्वच्छतेची जबाबदारी मुख्यत्वे असलेल्या आरोग्य कोठ्यांचे कामकाज कसे चालते, निकषांप्रमाणे स्वच्छता होते की नाही, हे पाहण्याकरिता पालिकेचे अतिरिक्त आयुक्तच आता पहाटे देखील तपासणी करणार आहेत. 

आरोग्य कोठ्यांना सकाळी साडेसहा वाजता भेटी  देऊन पाहणी करण्यासोबतच नागरिकांशी संवाद साधून स्वच्छतेबाबत असलेल्या अडचणी आणि समस्या समजून घेतल्या जाणार आहेत.

पालिकेच्या प्रत्येक प्रभागामध्ये एक चार आरोग्य कोठ्या आहेत. शहरात 500 पेक्षा अधिक आरोग्य कोठ्या आहेत. झाडण काम करणाऱ्या सेवकांपासून स्वच्छताविषयक कामे करणाऱ्या सेवकांची हजेरी घेणे, त्यांना कामाची ठिकाणे नेमून देणे तसेच त्यांच्या कामाचे निरीक्षण आरोग्य कोठी स्तरावर होते. या कोठ्यांची जबाबदारी मोकादमांवर असल्याने त्यांनीही स्वच्छताविषयक कामांमध्ये सक्रीय असणे आवश्यक आहे. परंतु, बऱ्याचदा पालिकेचे कर्मचारी गणवेश घालत नाहीत.

_MPC_DIR_MPU_II

गुटखा, पान, तंबाखू खाऊन थुंकत असतात. यासोबतच 30 टक्क्यांच्या आसपास कर्मचारी हे प्रत्यक्ष कामावरच येत नसल्याच्याही तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाल्या आहेत. या कर्मचाऱ्यांच्या ऐवजी बदली कामगार लावून मुळ सेवकाच्या सह्या घेऊन कागदोपत्री सोपस्कार पूर्ण केले जातात.

स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छताविषयक कामे वाढविणे आणि या कामांमध्ये गुणवत्तापूर्ण सुधारणा करण्याचे प्रयत्न अतिरीक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी  सुरु केले आहेत. त्याअनुषंगाने डॉ. खेमनार हे आरोग्य कोठ्यांना पहाटे भेट देणार असून कामकाजाची पाहणी करणार आहेत. यासोबतच परिसरातील स्वच्छतेचा आढावा घेणे, नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे.

स्वच्छ सेवा सहकारी संस्थेचे कर्मचारी घरोघर जाऊन वर्गीकृत कचरा गोळा करतात. या अनौपचारीक पद्धतीने काम करणाऱ्या कचरा वेचकांना  जेवणाकरिता स्वच्छ जागा, पाणी, हात धुण्याची आणि स्वच्छतागृहाची आवश्यक सोय ठेकेदारामार्फत करुन घेण्याच्या सूचना अतिरीक्त आयुक्तांनी दिल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.