Pimpri News: जाहिरातदारांनी अनधिकृत फलक अधिकृत करून घ्यावा, अन्यथा कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत जाहिरात फलकांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान आणि शहराचे विद्रूपीकरण होत आहे. याला आळा घालणे, त्यावर नियंत्रण ठेवणे आणि महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करणे, यासाठी जाहिरातदारांनी अनधिकृत जाहिरात फलक अधिकृत करून घेणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय पथके नियुक्त करण्याचा आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी क्षेत्रीय कार्यालयांना दिला आहे.

उद्योगधंदे आणि जाहिरात फलकांना परवाना देणे, त्यांचे नूतनीकरण करण्याची जबाबदारी महापालिका आकाश चिन्ह आणि परवाना विभागाची आहे. त्याद्वारे महापालिकेला उत्पन्न मिळते. मात्र, अनधिकृत लोखंडी स्ट्रक्चरवर आणि विद्युत खांबावर लावल्या जाणाऱ्या जाहिरात फलकांचे प्रमाण वाढत आहे.

ते पडून जीवित आणि वित्तहानी होऊ शकते. ते टाळण्यासाठी प्रभागनिहाय अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्यासाठी खासगी एजन्सी नियुक्त करण्याची कार्यवाही अंतिम स्तरावर आहे. शहरात 31 मार्चपूर्वी अस्तित्वात असलेले जाहिरात फलक अधिकृत केले जाणार आहेत.

त्यासाठी जाहिरातदारांनी 15 दिवसांत आवश्यक कागदपत्रे सादर करायची आहेत. प्रत्येक फलकाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून धोकादायक फलक काढले जातील. त्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी अतिक्रमण पथक, ठेकेदाराकडील मजूर, आकाशचिन्ह आणि परवाना विभागाकडील कर्मचारी असे मनुष्यबळ उभे करायचे आहे.

आकाशचिन्ह आणि परवाना विभागात आठ प्रभागांसाठी केवळ चार परवाना निरीक्षक आहेत. यामध्ये सर्वेक्षणासाठी परवाना निरीक्षक एस. बी. मळेकर, जी. एच. भाट, एस. एम. चव्हाण, आर. बी. बांदल यांचा समावेश आहे. त्यांच्या नियंत्रणाखाली आठही क्षेत्रीय कार्यालय स्तरावर पथके नियुक्त करून फलकांची नोंद करण्याचे काम दोन महिन्यांत पूर्ण करून अहवाल सादर करायचा आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.