Wakad : सात महिन्यानंतर देखील वाहतूक नियंत्रण कक्षाला फोन उपलब्ध होईना

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक नियंत्रण कक्षाची अद्याप पूर्णपणे उभारणी झाली नाही. वाहतूक नियंत्रण कक्ष सुरु होऊन सात महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्यापपर्यंत वाहतूक नियंत्रण कक्षाला फोन उपलब्ध झालेला नाही. यामुळे नागरिकांना पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षाला फोन करून वाहतुकीबाबत समस्या मांडाव्या लागत आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापन झाले. 15 ऑगस्ट 2018 रोजी आयुक्तालयाची सुरुवात झाली. त्यानंतर पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांच्या हस्ते 24 ऑक्टोबर 2018 रोजी वाहतूक नियंत्रण कक्षाचे उद्घाटन झाले. त्यानंतर पोलिसांकडून फोन कनेक्शन घेण्यसाठी अर्ज करण्यात आला आहे. उद्घाटन होऊन आणि अर्ज करून सात महिन्यांचा कालावधी उलटून गेला. तरी अद्याप फोन कनेक्शन आले नाही. त्यामुळे नागरिकांना पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षाला फोन करून वाहतुकीबाबत माहिती, तक्रारी द्याव्या लागत आहेत.

वाहतूक नियंत्रण कक्षातून नागरिकांच्या येणा-या तक्रारी पुढे वाहतूक पोलिसांकडे देऊन त्यावर कारवाई करण्यात येते. तसेच वाहतूक पोलिसांनी वाहन चालकांवर केलेल्या विविध कारवायांवर खटले दाखल करण्यासाठी संबंधितांना पोलीस ठाण्यामार्फत नोटीस पाठवणे, न्यायालयाची प्रक्रिया यांसारखी विविध कामे होतात.

सहाय्यक पोलीस आयुक्त नीलिमा जाधव म्हणाल्या, “वाकड ब्रिज येथे सध्या पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलीस नियंत्रण कक्ष सुरु आहे. मात्र कायमस्वरूपी वाहतूक नियंत्रण कक्षाचे काम चिंचवडमधील चापेकर चौकात सुरु आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या आठवडाभरात वाहतूक नियंत्रण कक्ष चिंचवड येथे स्थलांतरित होणार आहे. फोन कनेक्शनसाठी अर्ज केला आहे. कार्यालय स्थलांतरित झाल्यानंतर तात्काळ फोन कनेक्शन सुरु करण्यात येईल. तसेच सध्या असलेल्या नियंत्रण कक्षात फोन सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.