Akurdi : पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरून शिवसेना नगरसेवकाच्या कार्यालयासमोर टोळक्याचा राडा; भाजपच्या कार्यकर्त्यावर एकाच दिवशी दुसरा गुन्हा

A mob in front of the Shiv Sena corporator's office for lodging a complaint with the police; Another crime against BJP worker on the same day

एमपीसी न्यूज – ‘शिवसेना नगरसेवकासोबत का फिरतो’, असे म्हणत एका कार्यकर्त्याला फोनवरुन अर्वाच्य भाषेत शिवीगाळ, दमदाटी केली. तसेच भरचौकात मारण्याची धमकी दिली. याबाबत संबंधित कार्यकर्त्याने पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर चार जणांच्या टोळक्याने शिवसेना नगरसेवक अमित गावडे यांच्या कार्यालयासमोर जाऊन तक्रार देणाऱ्या कार्यकर्त्याला शिवीगाळ करत मारहाण केली. याबाबत आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपच्या युवा मोर्चाचे माजी प्रदेश चिटणीस, राज्य माथाडी महामंडळाचे माजी सल्लागार सदस्य अनुप मोरे यांच्यावर एकाच दिवशी हा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनुप अविनाश मोरे (रा. प्राधिकरण निगडी), यांच्यासह गौरव गोळे, आशिष राऊत, सिद्धार्थ मोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राहुल गावडे (वय 36, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे.

अनुप मोरे यांनी आज (सोमवारी) सकाळी प्रसाद नारायण पांडे यांना फोनवरून अश्लील शिवीगाळ केली. तसेच पालिका निवडणुकीपर्यंत अमित गावडे यांच्यासोबत फिरायचे नाही’, अशी दमबाजी केली.

फोनची सुरुवातच अवार्च्य शिवीगाळ करत सुरु केली. राजकारणात मी माफ करणार नाही. बापासमोर चौकात हाणणार आहे. दररोज मारील. यापुढे अमित गावडे सोबत दिसला नाही पाहिजे. आमच्यासोबत राहायचं तर इमानदारीत राहायचं. त्याच्यासोबत राहिचयं तर नुकसान पण सहन कराचयं. नुकसानच करणार, सोडणार नाही.

त्यामुळे शेवटचे सांगतो. त्याच्यासोबत दिसला तर तुला त्रास होणार. तिथं दिसला तर उचलून नेईन, भर चौकात मारेल. हात पाय तोडीन. पालिका निवडणुकीपर्यंत अमित गावडे सोबत दिसला तर याद राख, माझ्या ऐवढे वाईट कोण नाही. मागच्या वेळी काय झालं होतं ते तुला माहिती आहे. शेवटची वॉर्निंग”, अशा प्रकारची धमकी देत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली आहे.

दमबाजी झाल्याबाबत पांडे यांनी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार अनुप मोरे यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा का दाखल केला असे म्हणत आरोपी अनुप मोरे आणि त्यांच्या तीन साथीदारांनी मिळून नगरसेवक अमित गावडे यांच्या कार्यालयाबाहेर राडा केला.

‘प्रसाद पांडे याला आमच्या ताब्यात द्या. आम्ही त्याला आता मारून टाकतो’ अशी धमकी देत हाताने मारहाण करत शिवीगाळ केली. याबाबत आणखी एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

अनुप मोरे यांच्यावर एकाच दिवसात दोन अदखलपात्र तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.