Akurdi : मिस्टिक बांबू गुरुपोर्णिमा उत्सवामध्ये उदयोन्मुख कलाकारांचे प्रभावी बासरी वादन

एमपीसी न्यूज – प्रसिद्ध बासरीवादक हिमांशू नंदा यांच्या (Akurdi) दी मिस्टिक बांबू या वादनसंस्थेने गुरुपोर्णिमेनिमित्त आयोजित केलेल्या बासरीवादन उत्सवामध्ये नंदा यांच्या पन्नास शिष्यांनी सुरेल बासरीवादन सादर केले. रविवारी आकुर्डीतील ग.दि. माडगुळकर सभागृहात झालेल्या या बहारदार कार्यक्रमाममध्ये या शिष्यांनी भुपाळी, वृंदावनी सारंग देस, धनी, मेघ, भीमपलासी यासारखे अनेक राग सादर केले. भारतीय शास्त्रीय संगीतात रुची असणाऱ्या अनेकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.

मिस्टिक बांबूचे संस्थापक संचालक असलेले हिमांशू नंदा यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. संस्थेचे संचालक असलेले राहुल साळेगावकर आणि ज्ञान प्रबोधिनीचे सल्लागार यशवंत लिमये हेही यावेळी उपस्थित होते.

त्यानंतर उपस्थित शिष्यांसह हिमांशू नंदा यांनी त्यांचे गुरु आणि विख्यात बासरीवादक पंडित हरीप्रसाद चौरसिया यांना गुरुपोर्णिमेनिमित्त आदरांजली वाहिली. नंदा यांनी पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्याकडून गुरुकुल पद्धतीने बासरीवादनाचे शिक्षण घेतले आहे.

या वेळी बोलताना नंदा म्हणाले की, “गुरुबीन ग्यान कछु नाही आवे या” संत कबीरांच्या वचनातून जे मर्म प्रकटते ते भारतीय शास्त्रीय संगीत परंपरेचा आत्मा आहे. गुरुशिष्य परंपरेमध्ये गुरु आणि शिष्य यांच्यातील नात्याला अतिशय महत्त्व असून गुरुंप्रती वाटणारे प्रेम आणि आदर हे त्यांच्या शिष्यांच्या कलाकृतीतून प्रकट होत असते.

हिमांशू नंदा यांचे शिष्य आणि मिस्टिक बांबू संस्थेतील प्रशिक्षक क्षितिज सक्सेना आणि आकाश पट्टनायक यांची जुगलबंदी या कार्यक्रमाचा आकर्षण ठरली.

त्यांनी राग मधुवंतीसह एक भजन सादर केले. बासरीवादनातील नजाकत आणि त्याला तालाची मिळालेली तोलामोलाची साथ यामुळे हे युगलवादन खुप रंगले.

Talegaon Dabhade : काँग्रेस आय पक्ष ज्येष्ठ नागरिक सेलच्या अध्यक्षपदी ॲड. निवृत्ती फलके

हिमांशू नंदा यांच्या ज्येष्ठ शिष्या इशिता गाडे आणि श्लोका शिंदे यांनी (Akurdi) यावेळी राग धनी सादर केला. या दोघा छोट्या कलाकारांच्या युगल वादनाने श्रोत्यांची मने जिंकली.

सई पाटील यांचा राग जोगमधील एकल वादन तसेच धनंजय देशपांडे, स्वप्नील भूतकर, सुहास वैद्य आणि शिरिष जोशी यांच्या वादनाचा श्रोत्यांना आनंद लुटला.
हिमांशू नंदा यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या बासरीवादनाने या उत्सवाची सांगता झाली. गुरु हरिप्रसाद चौरसिया यांना आदरांजली म्हणून केलेल्या या वादनाने श्रोत्यांना सांगितिक शांती आणि समाधानाची अनुभुती दिली.

हिमांशू नंदा यांचे बासरीवादन आणि त्याला लाभलेली पांडुरंग पवार यांची तबल्यावरील तितकीच तोलामोलाची साथ यामुळे हा कार्यक्रम श्रोत्यांच्या दीर्घकाळ स्मरणात राहिल असा झाला.
शिष्यांनी आणि शिक्षकांनी केलेल्या बासरीवादनाला दिपीन दास आणि मनोज देशमुख यांची सुरेल साथसंगत लाभली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.