akurdi News: महा-ई-सेवा केंद्रात सोशल डिस्टंसिंगचा फज्जा; विविध दाखले घेण्यासाठी नागिरकांची मोठी गर्दी

या केंद्रात इतर सेवा केंद्रांच्या तुलनेत नेहमीच जास्त गर्दी झालेली पहायला मिळते.

एमपीसीन्यूज : दहावी, बारावीचा निकाल लागल्याने पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक असलेले दाखले काढण्यासाठी पालकांसह विद्यार्थ्यांची सेतू, आपले सरकार व महा-ई-सेवा केंद्रावर गर्दी होत आहे. यामुळे सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र प्राधिकरणातील तहसीलदार कार्यालयातील महा-ई-सेवा केंद्रावर पहायला मिळाले. ‘ऑनलाईन ‘ दाखले मिळविण्याची सुविधा असतानाही नागिरकांची होणारी गर्दी चिंतेचा विषय बनला आहे.

शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक असलेले दाखले किंवा इतर सरकारी कारणांसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे, दाखले मिळविण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात ३० महा ई सेवा केंद्रे आहेत. त्यापैकी एक प्राधिकरणातील तहसीलदार केंद्रात आहे.

या केंद्रात इतर सेवा केंद्रांच्या तुलनेत नेहमीच जास्त गर्दी झालेली पहायला मिळते. मात्र सध्या कोरोना महामारीमुळे सोशल डिस्टंगसिंगचे निर्बंध लागू आहेत. मात्र याचा फज्जा तहसीलदार केंद्रातील महा ई सेवा केंद्रात पहायला मिळत आहे.

सरकारच्या विविध योजना, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, कर्जासाठी उत्पन्नाचा दाखला आवश्यक ठरतो. जन्म-मृत्यू दाखला, रहिवासी दाखला, ही कागदपत्रे आवश्यक असतात. अनेक वेळा ही अर्जंट गरज म्हणून नागरिक तातडीने असे दाखले मिळविण्यासाठी प्रयत्नशील असतात.

याचबरोबर या सेवा केंद्रामधून ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखल, अल्पभूधारक, राष्ट्रीयत्वाचा दाखल, ऐपतीचा दाखला, वारसा प्रमाणपत्र, नवीन शिधापत्रिका दाखल. भूमिहीन शेतमजूर, नॉन क्रिमिलेअर, शेतकरी दाखला आदी १५ ते १६ प्रकारचे दाखले या सेवा केंद्रामध्ये दिले जातात.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी आवश्यक असणारे हे विविध प्रकारचे दाखले वेळेत मिळावेत यासाठी प्राधिकरणातील या सेवा केंद्रात विद्यार्थी व पालकांकडून प्रयत्न केला जात आहे. या सर्व प्रक्रिया ऑनलाइन देखील होत आहेत. मात्र नागरिक,विद्यार्थी कोणत्याही सोशल डिस्टंगसिंगचे पालन न करता गर्दी करीत असल्याचे दिसून येत आहे.

नियम पळून कामकाज करा- तहसीलदार

पिंपरी चिंचवड शहरातील महा ई सेवा केंद्रे ठेकेदारी पद्धतीवर चालविण्यास दिली आहेत. प्रत्येक केंद्रात सोशल डिस्टंगसिंगचे पालन अनिवार्य असल्याची सक्त ताकीद व सूचना देण्यात आलेल्या आहेत. सध्या शाळा, कॉलेज यांच्या प्रवेश प्रक्रिया सुरु होण्याची सुरुवात असल्याने दाखले मिळविण्यासाठी एकाच वेळी गर्दी होऊ लागली आहे. मात्र तरीही कोरोना महामारीमुळे सोशल डिस्टंगसिंगचे नियम पळून सर्व कामकाज करावे लागणार आहे. याबाबत ठेकेदाराला सांगण्यात आले आहे. तर सर्व शासकीय दाखले ऑनलाइन देखील मिळत आहेत. या सुविधेचा लाभ नागिरकांनी घ्यावा, असे तहसीलदार गीता गायकवाड म्हणाल्या.

गर्दी नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न – चव्हाण

महा इ सेवा केंद्र चालविणारे कंत्राटदार राजेश चव्हाण म्हणाले, सोशल डिस्टंगसिंगचे नियम पाळले जावेत यासाठी खबरदारी घेतली जात आहे. आतापर्यत केवळ १० टोकन दिले जात होता. मात्र सध्या गरज लक्षात घेऊन ५० टोकन दिले जात आहे. इतर सेवा केंद्राच्या तुलनेत प्राधिकरणातील सेवा केंद्रात अर्ज जमा केल्यास तातडीने काम होते असा समज नागिरकांचा असल्याने येथे जास्त गर्दी होत आहे. सोमवार आणि गुरुवार केंद्रावर जास्त गर्दी होते. त्यामुळे हे दोन दिवस गर्दी नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल.

सध्या शाळा, कॉलेज बंद असल्यामुळे काहीच व्यवस्थित माहिती मिळत नाही. ऑनलाईन दाखले मिळविण्यातहि अडचणी येत आहेत.  विविध प्रमाणपत्रे वेळेत सादर करावी लागतात. प्रमाणपत्र सादर करण्यात विलंब झाल्यास आम्हाला नवीन प्रवेश घेण्यात अडचणी येण्याची शक्यता वाटते.  त्यामुळे प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याआधीच आवश्यक ती कागदपत्रे काढण्यासाठी आम्ही सेवा केंद्रावर आलो आहोत. इतर ठिकाणी जादा पैसे तर घेतातच आणि लवकर दाखले सुद्धा मिळत नसल्याचा अनुभव असल्याने प्राधिकरणातील सेवा केंद्राला प्राधान्य दिले आहे. नीलम सोहनी- विद्यार्थिनी, कासारवाडी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.