Alandi News : संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त शहराच्या विविध भागातून आळंदीला 188 जादा बस

एमपीसी न्यूज – संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त पीएमपी प्रशासनाने जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. 3 डिसेंबर पर्यंत आळंदी मार्गावरील 91 आणि जादा 188 अशा एकूण 279 गाड्या शहराच्या विविध भागातून सोडल्या जात आहेत. सोमवार (दि. 29) पासून रात्रीच्या वेळी देखील आवश्यकतेनुसार गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

स्वारगेट, हडपसर, पुणे रेल्वे स्टेशन, मनपा, निगडी, पिंपरी, चिंचवड, देहूगाव, भोसरी, रहाटणी येथून या गाड्या सोडण्यात येणार आहेत. यात्रेनिमित्ताने आळंदी गावातील पीएमपीचे बस स्थानक काटेवस्ती येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. आळंदी ते बहुळगाव मार्ग यात्रा कालावधीत पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे वाघोली ते आळंदी मार्गावरील गाड्या मरकळ रस्त्यावरील लक्ष्मी मंगल कार्यालयापासून सुटणार आहेत.

यात्रेसाठी रात्री आठनंतर सोडण्यात येणा-या गाड्यांसाठी सध्याच्या तिकिटापेक्षा पाच रुपये जास्त आकारले जाणार आहेत. एकदिवसीय, साप्ताहिक, मासिक, ज्येष्ठ नागरिक आणि अन्य पासधारकांना रात्री अकरानंतर जादा गाड्यांमध्ये पासचा वापर करता येणार नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.