Ind vs NZ Test Match: भारताने कसोटीवर मिळवली जबरदस्त पकड

एमपीसी  न्यूज  (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) – आधी हाराकरी करून आपल्याच हाताने आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली खरी, एक वेळ आता हा सामना आपल्या हातातून गेला अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर नवोदित श्रेयसने गड लढवला आणि नुसता लढवलाच नाही तर आपल्या विक्रमी कामगिरीने भारतासाठी विजयाचे दरवाजे सुद्धा खुले केले. या कामगिरीमुळेच भारताने पाहुण्या न्यूझीलंड संघांपुढे मोठे आव्हान निर्माण केले आणि याला तोंड देताना अश्विनने पहिला बळी मिळवून विजयाच्या मार्गाकडे दिमाखात पाऊल टाकले आहे.

श्रेयस अय्यरने सलामीच्या आणि मधल्या फळीतल्या फलंदाजांचे अपयश विसरत लावणारी कामगिरी करताना, अश्विन, साहा बरोबर अर्धशतकी भागीदारी केली ज्यामुळे अत्यंत कठीण अवस्थेतून भारताचा संघ मजबूत स्थितीत आला. या श्रेयसने रचलेल्या पायावर अक्षर पटेल आणि वृद्धीमान साहाने कळस चढवला ज्यामुळे भारताने आपला दुसरा डाव 234 धावांवर घोषित करून न्यूझीलंड संघांपुढे 284 धावांचे लक्ष्य ठेवले आहे, ज्याला उत्तर देताना आजचा खेळ समाप्त झाला तेव्हा पाहुण्या संघाची अवस्था एक गडी बाद चार झाली आहे.

आज सकाळी भारताने कालच्या एक बाद चौदा वरुन आज खेळ सुरू केला, पण अल्पावधीतच भारतीय संघाची अवस्था एकदम बिकट झाली. पुजारा, रहाणेचे अपयश आजही चालूच राहिले, दोघेही फलंदाज आपल्या लौकिकाला साजेसे खेळू शकले नाहीत, त्यातच मयंकही बाद झाला आणि त्याच पाठोपाठ जडेजाही शून्यावर बाद झाल्याने आपल्या संघाची अवस्था पाच बाद 51 धावा अशी कठीण झाल्याने भारतीय संघापुढे पराभवाचे काळेकुट्ट ढग भरून आलेले दिसत होते. सर्व प्रथितयश फलंदाज बाद झाले होते आणि मैदानावर आपली पहिलीच कसोटी खेळत असलेला श्रेयस आणि अश्विन होते, पण श्रेयसने धीरोदात्त खेळ करत भारतीय संघाच्या डावाला निराशेच्या खोल गर्तेतून बाहेर काढले आणि त्याला अश्विनने चांगली साथ देत डावाला आकार दिला.

श्रेयसने दडपणाखालीही सुंदर आणि आक्रमक खेळ करत आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करत भारतीय संघाची भावी पिढी किती आश्वासक आहे, याची सुंदर अनुभूती दिली. पहिल्या डावात शतक केलेल्या श्रेयसने दुसऱ्या डावात 65 धावा करताना अशी कामगिरी करणारा जगातला तिसरा तर भारताचा पहिला फलंदाज म्हणून विक्रमाच्या पुस्तकात आपले नाव सुवर्णाक्षराने गोंदले आहे. या जोडीने अर्धशतकी भागिदारी केल्यानंतर रवी अश्विन 32 धावा काढून जेमिसनच्या गोलंदाजीवर त्रिफळाबाद झाल्यावर पुन्हा एकदा भारतीय डाव गडगडणार, असे वाटू लागले होते, पण दुखापत झाली असल्यानंतरही साहा मैदानावर आला आणि त्याने सर्व दुखापती विसरून एखाद्या धीरोदात्त योद्ध्यासम खेळ करून आजही तो भारतातील सर्वोत्तम यष्टीरक्षक फलंदाज आहे, हे सिद्ध करणारी कामगिरी केली.

या जोडीने भारतीय संघाची आघाडी 200 च्या आसपास वाढवली, श्रेयसच्या आत्मविश्वासपूर्ण खेळाने तो दुसऱ्या डावातही शतक करेल, अशी आशा वाटत असतानाच तो 65 धावा करून साउदीच्या गोलंदाजीवर बाद झाला, पण त्याने उरलेल्या फलंदाजांच्या मनात लढण्याची उर्मी निर्माण करण्याचे मोठे काम केले, ज्यावर अक्षर पटेल आणि साहाने शिक्कामोर्तब केले,या दोघांनी नाबाद 67 धावांची भागीदारी केल्याने कर्णधार अजिंक्य रहाणेने डाव घोषित केला. यावेळी भारताची धावसंख्या 7 बाद 234 अशी झाली होती. आधीच्या डावातल्या 49 धावा असल्याने न्यूझीलंड संघाला विजयासाठी 284 धावांचे मोठे लक्ष्य गाठावे लागेल आणि हे आतातरी फारच कठीण म्हणता येईल, कारण आजतागायत भारतात कुठल्याही विदेशी संघाला 276 च्या पुढे जाता आलेले नाही.

284 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाची सुरुवात अपेक्षितच झाली आणि अश्विनने दुसऱ्या डावाच्या तिसऱ्याच षटकात विल यंगला दोन धावांवर पायचीत करून भारताला पहिले यश मिळवून दिले. अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबला तेव्हा नाईट वॉचमन समरविल व टॉम लथम यांनी अधिक पडझड होवू दिली नाही. त्यामुळे आजचा खेळ संपला तेंव्हा पाहुण्या संघाची अवस्था दुसऱ्या डावात एक बाद चार अशी झाली होती.

उद्याच्या दिवसात तब्बल 90 षटके पडणार असल्याने या सामन्यात भारतीय संघ पाहुण्या संघाची दैना उडवणार हे नक्की, आता ते किती वेळात, ते उद्या कळेलच!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.