Alandi : खुनाच्या गुन्ह्यात आठ वर्षांपासून फरार असलेल्या महिला आरोपीला अटक

Woman accused of murder absconding for eight years arrested

गुन्हे शाखा युनिट तीनची कारवाई

एमपीसी न्यूज – आळंदी पोलीस ठाण्यातील खुनाच्या गुन्ह्यात मागील आठ वर्षांपासून फरार असलेल्या महिला आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी अटक केली. आरोपी महिला घटना घडल्यानंतर स्थलांतर करून राहत होती.

सिंधू एकनाथ मानकर (वय 50, रा. पद्मावती झोपडपट्टी, साठेनगर, आळंदी) असे अटक केलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी परिसरात 2012 साली एक खुनाचा गुन्हा घडला होता. यामध्ये एकूण नऊ आरोपी होते. घटना घडल्यानंतर पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली. त्यांना खेड राजगुरुनगर अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

तसेच अन्य कलमान्वये आरोपींना सक्त मजुरीची देखील शिक्षा सुनावण्यात आली. सर्व आरोपी येरवडा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहेत.

पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी सर्व अधिका-यांना फरार आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस आरोपी सिंधू या महिलेची माहिती काढत होते.

सिंधूने गुन्हा घडल्यानंतर अटक टाळण्यासाठी वास्तव्य बदलले होते. पोलीस शिपाई सागर जैनक आणि पोलीस शिपाई त्रिनयन बाळसराफ यांना माहिती मिळाली की, आरोपी सिंधू हवेली तालुक्यातील धायरी फाटा येथे आहे. त्यानुसार पोलिसांनी परिसरातून सिंधूला ताब्यात घेतले.

तिच्याकडे चौकशी केली असता तिने गुन्हा केल्याचे कबूल केले. पुढील कारवाईसाठी आरोपी सिंधूला आळंदी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर बाबर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, उपनिरीक्षक गिरीश चामले, पोलीस कर्मचारी गंगाधर चव्हाण, विठ्ठल सानप, हजरत पठाण, सचिन मोरे, यदु आढारी, त्रिनयन बाळसराफ, महेश भालचीम, राजकुमार हणमंते, सागर जैनक, योगेश्वर कोळेकर, प्रमोद ढाकणे, नाथा केकाण, राहुल सूर्यवंशी, आशा जाधव यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.