Alert From Interpol : कोरोना लसीच्या निर्मिती, वितरणात जागतिक गुन्हेगारी संघटना कुरापती करण्याची शक्यता; इंटरपोलकडून सावधानतेचा इशारा

एमपीसी न्यूज – कोरोना साथीने संपूर्ण जगाला ग्रासले आहे. सुमारे वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर कोरोनावरील लस बाजारात येण्याच्या तयारीत आहे. अशा परिस्थितीत लसीचे बनावटीकरण करून फसवणूक होण्याचा धोका आहे. अनेक संधीसाधू लोक लसीचे बनावटीकरण करून तसेच फसव्या जाहिरातींद्वारे नागरिकांची फसवणूक करण्याची शक्यता आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी ऑनलाईन माध्यमातून कोरोनाशी संबंधित कोणतीही औषधे, उपकरणे घेताना सावधानता बाळगावी, असा सतर्कतेचा इशारा इंटरपोलने दिला आहे.

इंटरपोलने ऑरेंज नोटीस जाहीर केली आहे. त्यात कोविड 19 लसीचे बनावटीकरण, चोरी आणि फसव्या जाहिराती याबाबत सांगण्यात आले आहे.

काही कंपन्यांनी तयार केलेली कोरोना लस मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. मंजुरी मिळाल्यानंतर तिचे जागतिक पातळीवर वितरण केले जाणार आहे. वितरणाची साखळी सुरक्षित करण्यासाठी बनावट औषधे विकणा-यांवर कारवाई करणे आवश्यक आहे. अशा वेबसाईट शोधून त्यावर जागतिक पातळीवर सर्वत्र कारवाई केली जाणार आहे.

कोरोनावरील लस हे आंतरराष्ट्रीय पातळीवर गुन्हेगारी संघटनांचे लक्ष्य आहे. बनावट, खोट्या वेबसाईटच्या माध्यमातून नागरिकांना त्यात ओढण्याची आणि त्यांच्या जीवाला धोका निर्माण करण्याची शक्यता इंटरपोलने व्यक्त केली आहे. कुरापतींच्या सर्व शक्यता पडताळून तयारी करावी, असेही इंटरपोलने सर्व राष्ट्रांना म्हटले आहे.

मागील काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय प्रवास सुरु झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्याबरोबरच टेस्टिंग किट्सच्या बनावटीकरणाकडे देखील लक्ष देणे आवश्यक आहे. तीन हजार वेबसाईटच्या माध्यमातून नकली औषधे आणि उपकरणे विकली जात असल्याची बाब इंटरपोल सायबर विभागाच्या निदर्शनास आली आहे.

नागरिकांनी कोरोनाशी संबंधित औषधे आणि इतर बाबी ऑनलाईन शोधताना अधिक सतर्कता बाळगावी. ऑनलाईन घोटाळ्यात न अडकण्यासाठी नागरिकांनी राष्ट्रीय आरोग्य संस्था आणि जागतिक आरोग्य संघटना यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असेही इंटरपोलकडून सांगण्यात आले आहे.

सरकार लस तयार करण्याच्या तयारीत असताना गुन्हेगारी संघटना त्यात अडथळा आणण्याच्या तयारीत आहेत. आरोग्य नियामक संस्था आणि कायद्याची अंमलबजावणी करणा-या संस्था यांच्यात सामंजस्य असावे. व्यक्तींची सुरक्षा आणि संरक्षण यासाठी हे सामंजस्य महत्वपूर्ण भूमिका बजावेल, असे इंटरपोलचे सेक्रेटरी जनरल जुर्गन स्टॉक यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.