Corona Vaccine : दीड महिन्याच्या खंडानंतर पालिकेकडे कोरोना प्रतिबंधक कोव्हिशिल्ड लस उपलब्ध

एमपीसी न्यूज –  दीड महिन्याच्या खंडानंतर महापालिकेकडे कोरोना प्रतिबंधक कोव्हिशिल्ड लस उपलब्ध झाली आहे. महापालिकेच्या आठ रुग्णालयांमध्ये लस (Corona Vaccine) देण्याची व्यवस्था केली आहे. महापालिकेकडे साडेआठ हजार डोस उपलब्ध झाले असून, बुधवारपासून लस दिली जाणार आहे. प्रत्येक केंद्रावर प्रत्येकी पाचशे डोस उपलब्ध असतील.

राज्य व केंद्र सरकारच्या सूचनानुसार महापालिकेतर्फे सुरुवातीला फ्रंट लाइन वर्कर, आरोग्य कर्मचारी व अधिकाऱ्यांना लस देण्यात आली. त्यानंतर 60 वर्षांवरील ज्येष्ठांचे लसीकरण सुरू झाले. लशीच्या उपलब्धतेनुसार टप्प्याटप्प्याने लसीकरणाचे प्रमाण व लाभार्थी वाढविण्यात आले. सध्या 12 वर्षांवरील सर्वांना लस दिली जात आहे. काहींचे दोन्ही डोस घेऊन बुस्टर अर्थात प्रिकॉशन डोसही घेऊन झाले आहेत. डिसेंबरमध्ये लस उपलब्ध न झाल्याने लसीकरण बंद होते. आता कोव्हिशिल्ड लस उपलब्ध झाली आहे. कोव्हॅक्सिन, कोर्बेव्हॅक्स लशीचे डोस अद्याप उपलब्ध झालेले नाहीत.

Pimpri News : शिवसेना जिल्हाप्रमुखपदी माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांची नियुक्ती

कोरोना प्रतिबंधक लसीकरण 16 जानेवारी 2021 पासून शहरात सुरू आहे. त्याला आता  दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. गेल्या वर्षी 16 जानेवारीपर्यंत अर्थात लसीकरणाच्या (Corona Vaccine) एक वर्षात 31 लाख 67 हजार 671 जणांनी लस घेतली होती. लशीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांना बुस्टर डोस दिला जात आहे. आतापर्यंत सुमारे 40 लाख डोस दिले आहेत.

कोर्बेव्हॅक्स व कोव्हॅक्सिन लशीच्या पहिल्या डोसनंतर 28 दिवसांनी दुसरा डोस. दुसऱ्या डोसनंतर सहा महिने किंवा 26 आठवड्यांनी बुस्टर डोस – कोव्हिशिल्ड लशीच्या पहिल्या डोसनंतर 84 ते 112 दिवस किंवा 12 ते 16 आठवड्यांच्या दरम्यान दुसरा डोस. त्यानंतर सहा महिन्यांनी बुस्टर डोस घ्यायचा आहे.

लसीकरण केंद्र!

महापालिकेचे प्रभाकर कुटे हॉस्पिटल आकुर्डी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थात जुने तालेरा रुग्णालय चिंचवड, नवीन थेरगाव रुग्णालय, अंकुशराव लांडगे सभागृह भोसरी, यमनानगर रुग्णालय निगडी, नवीन जिजामाता रुग्णालय पिंपरी, अहिल्यादेवी होळकर शाळा जुनी सांगवी, वायसीएम हॉस्पिटल कुटुंब कल्याण विभाग खोली क्रमांक 62 या केंद्रांवर कोव्हिशिल्ड लस दिली जाणार आहे.

“महापालिकेकडे कोव्हिशिल्ड लशीचे साडेआठ हजार डोस उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे बुधवारपासून आठ रुग्णालयांच्या क्षेत्रानुसार लसीकरण केले जाणार आहे. प्रत्येक केंद्रावर पाचशे डोस उपलब्ध असतील”, असे वैद्यकीय विभागप्रमुख डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.