Ashadhiwari News : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहू-आळंदी परिसरात संचारबंदी

एमपीसी न्यूज – आषाढी वारीच्या निमित्ताने देहू, आळंदी मधून तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान करतात. कोरोना साथीचा काळ सुरू असल्याने शासनाने वारी सोहळा मर्यादित लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. देहू, आळंदी ही दोन्ही धार्मिक स्थळे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत येत असल्याने आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहू, आळंदी परिसरात संचारबंदी जाहीर केली आहे. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिले आहेत.

आयुक्तांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की –
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील देहुरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज मंदिर व आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर आहे. आळंदी येथे सालाबाद प्रमाणे 1 जुलै व 2 जुलै रोजी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पादुका प्रस्थान सोहळा व आषाढी वारी संपन्न होणार आहे. सध्या कोविड-19 विषाणुचा संसर्ग व प्रादुर्भाव राखण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील सर्व धार्मिक स्थळे, मंदिर बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे कोविड 19 विषाणुच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र शासनाने गेल्यावर्षी प्रमाणेच याही वर्षी 1 जुलै व 2 जुलै रोजी पालखी प्रस्थान सोहळा मोजक्या 100 मानकरी, वारकरी यांच्या उपस्थितीत पार पाडण्याचे शासनाने म्हटले आहे. श्री च्या पादुका देहु व आळंदी येथे पहिल्या मुक्कामाच्या ठिकाणी 18 जुलै रोजी पर्यंत ठेऊन 19 जुलै रोजी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या प्रत्येकी 2 बसने मोजक्या 40 वारक-यांसह आळंदी ते पंढरपुर नेण्याची परवानगी दिली आहे.

कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. तो रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संतश्रेष्ठ तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पादुका प्रस्थान सोहळा व आषाढी वारी ही सिमीत व प्रतिकात्मक स्वरुपात व्हावी यासाठी शासनाने संतश्रेष्ठ तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पादुका प्रस्थान सोहळा व आषाढी वारी पालखी सोहळा विभागीय आयुक्त, पुणे यांच्या सहनियंत्रणाखाली साजरा करण्यास परवानगी दिली आहे.

आषाढी वारीसाठी दरवर्षी आळंदी व देहु येथे मोठया प्रमाणात वारकरी भाविक जमतात. मात्र कोरोना साथीचा धोका लक्षात घेत या वर्षी काही निर्बंध घालण्यात आले आहेत.

खालील गावांमध्ये संचारबंदी –
देहुगांव व परिसरातील व आळंदी शहर व परिसरामध्ये आषाढी पायीवारी निमित्त मोठया प्रमाणात वारकरी भाविक येतात. यामुळे भाविक एकत्र येऊन गर्दी होण्याची व कोरोना विषाणुचा संसर्ग (प्रादुर्भाव) मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता असल्याने कोविङ-19 विषाणुचा प्रादुर्भाव वाढू नये, याकरिता देहुरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 1) देहुगाव नगरपंचायत हद्द, 2) येलवाडी, 3) माळवाडी, 4) तळवडे, 5) चिंचोली, 6) सांगुर्डी, आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 1) आळंदी, 2) केळगाव, 3) चऱ्होली खुर्द, 4) चिंबळी, 5) वडगाव घेनंद, 6) कोयाळी तर्फे चाकण, 7) धानोरे, 8) सोळू, 9) मरकळ, 10)  चऱ्होली बुद्रुक, 11) डुडुळगाव, 12) चोवीसावाडी या गावांमध्ये 28 जून ते 4 जुलै 2021 या कालावधीत संचारबंदी राहील.

# वरील गावांच्या हद्दीतील धर्मशाळा, मठ, भक्तनिवास, यात्रीभवन, हॉटेल, लॉजेस इत्यादीमध्ये भाविक/नागरिक यांना वास्तव्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. (श्री तुकाराम महाराज व श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थान समिती व प्रशासनाकडून देण्यात आलेले पासधारक वगळून)

# आषाढी पायीवारी कालावधीमध्ये वारकरी भाविक / नागरिक हे इंद्रायणी नदीच्या पाण्यात स्नान करणे हे पवित्र मानतात. त्यामुळे यात्रा कालावधीत इंद्रायणी नदीचे पाण्यात स्नान व हातपाय धुणे यामुळे भाविक एकत्र येऊन गर्दी होण्याची व कोरोना विषाणुचा संसर्ग, प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता लक्षात घेता 28 जून ते 20 जुलै या कालावधीत देहूगाव व आळंदी परिसरातील इंद्रायणी नदी पात्र/घाट येथे सर्व भाविक / नागरिकांना प्रवेश निषिद्ध राहील व नदीपात्रात स्नान व हातपाय धुण्यास बंदी लागू राहील.

# आषाढी पायीवारीला प्रामुख्याने बहुसंख्य वारकरी भाविक/नागरिक एस.टी महामंडळाची वाहने, पीएमपीएलची वाहने, महानगरपालिकेची वाहने व खाजगी वाहने यामधून देहूगांव व आळंदीकडे येत असतात. त्यामुळे 28 जून ते 4 जुलै या कालावधीत देहु, आळंदी व परिसरात सर्व प्रकारची सार्वजनिक व खाजगी प्रवासी वाहतुक बंद करण्यात आली आहे.

आदेशातून वगळण्यात आलेल्या बाबी –
# अत्यावश्यक वैद्यकीय सेवा पुरविणारी खाजगी/सरकारी रुग्णालये, दवाखाने, आरोग्य सेवा देणारे डॉक्टर, अॅम्ब्युलन्स सेवा व वैद्यकीय सेवेशी संबंधित कर्मचारी यांची वाहने तसेच अधिकृत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची वाहने.

# कायदेशीर कर्तव्य बजावत असणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचारी उदा. महसुल, पोलीस, अग्निशामक, विद्युत पुरवठा इ. विभागातील कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांची वाहने.

# जीवनावश्यक सेवेतील आस्थापना उदा. दुध, फळे, भाजीपाला, किराणा, पिण्याचे पाणी घरोघरी जारद्वारे पुरवठा, पाणीपुरवठा करणारी यंत्रणा तसेच घरगुती स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे सिलेंडर पुरवणारी यंत्रणा इत्यादी वाहने.

# प्रशासनाने पालखी प्रस्थान सोहळा व आषाढी पायीवारी निमित्त परवानगी दिलेले पासधारक यांची वाहने

# पोलीस बंदोबस्तासाठी आवश्यक असणा-या सुविधा पुरविणाऱ्या यंत्रणांची वाहने (उदा. भोजनालय, पाणी पुरवठा)

# देहुगांव व आळंदी शहरातील स्थानिक नागरिक यांची अत्यावश्यक सेवेसाठी वापरली जाणारी वाहने (ओळखपत्रांची पडताळणी करुन)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.