Bangluru : चांद्रयान मोहीम : विक्रम लँडरशी संपर्क तुटला ; ‘धीर सोडू नका !’ मोदींनी थोपटली इस्रोच्या वैज्ञानिकांची पाठ

एमपीसी न्यूज- भारताच्या चांद्रयान मोहिमेच्या अखेरच्या टप्प्यात चंद्रावर उतरण्यास दोन मिनिटं बाकी असताना विक्रम लँडरशी संपर्क तुटला. अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सीवन यांनी दिली. या मोहिमेकडे इस्रोच्या शास्त्रज्ञांसह देशाच्या प्रत्येक नागरिकाचे लक्ष लागून राहिले होते. देशातील जनता हा ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी सज्ज झाली होती. विक्रम लँडरशी संपर्क तुटल्यानंतर या मिशनवर काम करणाऱ्या सर्व वैज्ञानिकांचा पडलेला चेहरा पाहून त्याठिकाणी उपस्थित असलेल्या पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी त्यांना धीर दिला. या वैज्ञानिकांची पाठ थोपटत ‘हिंम्मत ठेवा, निराश होऊ नका, तुमचा देशाला अभिमान आहे, असे ते म्हणाले.

रात्री एक वाजून 45 मिनिटांनी विक्रम लँडरने चंद्रावर उतरण्यास सुरुवात केली. ‘विक्रम’चे चंद्रावतरण पाहण्यासाठी अवघा देश जागा होता. चंद्राच्या पृष्ठभागापासून यानाचं अंतर जसजस कमी होत होतं. तसं सर्वांची धाकधूक वाढली होती. संपूर्ण देशावासीयांचा उत्साह शिगेला गेला होता. इस्रो सेंटरमधील शास्त्रज्ञ विक्रम लँडरच्या मार्गक्रमणावर बारकाईने लक्ष ठेवून होते.

एक वाजून 53 मिनिटांनी विक्रम लँडर चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार होते. मात्र, चांद्रयान अवघे 2.1 कि.मी.वर असताना विक्रम लँडरशी असलेला संपर्क तुटला आणि शास्त्रज्ञांबरोबरच संपूर्ण देशाचा श्वास रोखला गेला. यावेळी उपस्थित असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांना धीर दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.