Bhosari: तडीपार गुन्हेगाराला पाच महिन्यात दोनदा अटक

Bhosari: banished criminal arrested twice in five months 17 फेब्रुवारी 2020 रोजी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाने त्याला अटक केली होती.

एमपीसी न्यूज- दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेल्या आरोपीला पाच महिन्यात दोन वेळा अटक करण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यात अटक केल्यानंतर तो जून महिन्यात पुन्हा शहरात आढळल्याने त्याला अटक करण्यात आली आहे.

विठ्ठल उर्फ नाया अंबादास शिंदे (वय 25, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी एमआयडीसी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस शिपाई सचिन मोरे यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विठ्ठल शिंदे हा 28 जून रोजी दुपारी भोसरी एमआयडीसी मधील बालाजीनगर झोपडपट्टी येथील बाबासाहेब आंबेडकर कमानीजवळ येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार, दुपारी सव्वा दोनच्या सुमारास सापळा रचून पोलिसांनी विठ्ठलला अटक केली.

आरोपी विठ्ठलला 16 एप्रिल 2019 रोजी मुंबई पोलीस कायदा कलम 56 (1) (अ) (ब) नुसार दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते.

त्याची तडीपारीची मुदत संपण्यापूर्वी तो फेब्रुवारी महिन्यात शहरात आला होता. 17 फेब्रुवारी 2020 रोजी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाने त्याला अटक केली होती.

त्यानंतर अवघ्या चार महिन्यांनी पुन्हा त्याच आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी विठ्ठल हा एमआयडीसी भोसरी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

संबंधित गुन्हेगाराची दहशत अथवा गुन्हेगारी कुरापती वाढल्याने त्याला तडीपार करण्यात येते. यामुळे परिसरात शांतता, कायदा व सुव्यवस्था निर्माण होण्यास मदत होते. मात्र, तडीपार केलेला एकच आरोपी चार महिन्यांच्या कालावधीत दोन वेळा सापडत आहे. त्यामुळे गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

एकदा अटक झाल्यानंतर गुन्हेगाराने सुधारणे अपेक्षित आहे. मात्र, पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक नसल्याने गुन्हेगार शहरात मोकाट फिरत असल्याचे चित्र दिसत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.