Pen : मौजमजा करून येत असताना भोसरीतील कारचा अपघात

एकाचा मृत्यू सहाजण जखमी

एमपीसी न्यूज – रविवारच्या सुट्टीनिमित्त अलिबाग येथे मौजमजा करण्यासाठी गेलेल्या भोसरीतील एका कारचा अपघात झाला. यामध्ये कारचालकाचा जागीच मृत्यू झाला असून कारमधील पाच जण तसेच अन्य एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी (दि. 21) रात्री अकराच्या सुमारास पेन-खोपोली रस्त्यावर आंबेवाडी येथे झाला.

_MPC_DIR_MPU_II

विशाल मुळे असे या अपघातात मृत्यू झालेल्या कारचालकाचे नाव आहे. तर शिवकुमार प्रजापती (वय 24), रिकी अग्रवाल (वय 35), मयूर अग्रवाल (वय 25), शिवम अग्रवाल (वय 18), अनिल अग्रवाल (वय 24, सर्व रा. भोसरी) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. तसेच या अपघातात नितीन वेताळ (रा. पेन) हा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.

पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी येथील सहा तरुण रविवारी सुट्टीनिमित्त मौजमजा करण्यासाठी अलिबाग येथे गेले. रात्री उशिरा ते पुण्याच्या दिशेने परत येत होते. सर्वजण मद्यधुंद अवस्थेत होते. पेन जवळ आंबेवाडी गावाजवळ नितीन त्याच्या दुचाकीवरून (एम एच 06 / बी आर 8625) जात होता. कारची नितीन याच्या दुचाकीला धडक बसली. यामध्ये नितीन दुचाकीवरून खाली पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्याऐवजी कारचालकाने कार जोरात पळवली. विशाल याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि त्यांची कार रस्त्याच्या खाली खोल खड्ड्यात पडली. यामध्ये विशाल याचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांनी हा अपघात बघून पोलिसांच्या मदतीने सर्व जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. कारमधील तरुणांची प्रकृती स्थिर असून दुचाकीस्वाराची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेची माहिती मिळताच पेन पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.