Bhosari Crime News : बुवाबाजी करून विवाहितेला पाजले कोंबडीचे रक्त

एमपीसी न्यूज – भोसरी परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बुवाबाजी करून पती, सासू आणि सासऱ्याने चक्क विवाहितेला कोंबडीचे रक्त पाजले. हे प्रकरण एवढ्यावर थांबले नाही, तर पती लैंगिक असक्षम असताना त्याचे लग्न लावून दिले. त्यानंतर सासऱ्याने विवाहितेशी लगट करण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी पती, सासू आणि सासऱ्याच्या विरोधात स्त्री अत्याचार, विनयभंग, जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती (वय 33), सासरा (वय 62), सासू (वय 53) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पीडित विवाहितेने रविवारी (दि. 19) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 30 डिसेंबर 2018 ते 19 जून 2021 या कालावधीत घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून रत्नागिरी येथे घर बांधण्यासाठी तसेच घरखर्चासाठी विवाहितेकडे पैशांची मागणी केली. विवाहितेवर बुवाबाजी करून तिला कोंबडीचे रक्त पाजले.

आरोपी सासऱ्याने विवाहितेशी लगट करण्याचा प्रयत्न करून तिचा विनयभंग केला. पतीकडे इंजिनिअरिंगची डिग्री असल्याचे लग्नाच्या वेळी सांगण्यात आले होते. मात्र त्याचे डिग्री पर्यंतचेही शिक्षण झालेले नाही. पती लैंगिकदृष्ट्या सक्षम नसल्याचे माहिती असूनही सासू आणि सासऱ्याने त्याचे लग्न पीडित विवाहितेसोबत लावून फसवणूक केली.

पतीच्या लैंगिक असक्षमतेबाबत विवाहितेने तिच्या आई, वडील व नातेवाईकांना सांगितले. त्या कारणावरून आरोपींनी विवाहितेला मारहाण करत शिवीगाळ व दमदाटी करून शारीरिक व मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम 498 (अ), 354 (अ), 323, 504, 506, 34, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व समुळ उच्चाटन कायदा कलम 3 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.