Bhosari Crime News : भोसरीत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज – भोसरीमध्ये एका तरुणाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. 13) दुपारी घडली.

तेजस तावरे (वय 22, रा. भोसरी. मूळ रा. वाशी, जि. उस्मानाबाद) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तेजस भोसरीमधील एका पेट्रोल पंपावर काम करत होता. त्याने मंगळवारी दुपारी राहत्या घरी छताला गळफास घेतला. हा प्रकार नातेवाईकांच्या निदर्शनास आल्यानंतर तेजसला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

तेजस याने पेट्रोल पंपाच्या मालकाकडून काही रक्कम आगाऊ घेतली होती. त्यावरून त्यांच्यात वाद झाला होता. पेट्रोल पंप मालकाने तेजसची दुचाकी आणि मोबाईल फोन ठेऊन घेत तेजससोबत वाद घातला होता. त्यातून त्याने आत्महत्या केली असल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान, तेजसने मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. ही चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली असून त्यातही त्याने पेट्रोल पंप मालकाकडून घेतलेल्या रकमेचा आणि झालेल्या वादाचा उल्लेख आहे. तेजसच्या अंत्यविधीसाठी सर्व नातेवाईक मूळ गावी गेले आहेत. अंत्यसंस्कार झाल्यानंतर गुन्हा दाखल करणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.