Bhosari : उसने घेतलेले पैसे परत करण्यासाठी त्याने रचला स्वतःच्याच अपहरणाचा बनाव

एमपीसी न्यूज – मौजमजा करण्यासाठी एका तरुणाने मित्रांकडून उसने पैसे घेतले. ते पैसे ठरलेल्या वेळेत परत करता आले नाही. त्यामुळे चक्क तरुणाने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला आणि त्या माध्यमातून खंडणीच्या स्वरूपात घरच्यांकडून पैसे उकळण्याची नामी शक्कल लढवली. पण पोलिसांच्या तांत्रिक कौशल्यापुढे त्याचा प्रयत्न पुरता फसला. हा बनाव एमआयडीसी भोसरी आणि खंडणी विरोधी पथकाने उघडकीस आणला.
विनय राजेंद्र चव्हाण (वय 22, रा. गंधर्वनगर, तापकीर नगर, मोशी) असे स्वतःच्या अपहरणाचा डाव फसलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, विनय याने मौजमजा करण्यासाठी मित्रांकडून उसने पैसे घेतले होते. ते पैसे तो वेळेत देऊ शकला नाही. मित्रांचे घेतलेले पैसे देण्यासाठी आणि स्वतःला मौजमजा करण्यासाठी त्याला पैसे कमी पडू लागले. दरम्यान त्याचा घरच्यांशी याबाबत वाद झाला. त्यातून त्याने अपहरणाची नामी शक्कल लढवत मंगळवारी (दि. 30) सकाळी स्वतः घर सोडले आणि मुंबईच्या दिशेने रवाना झाला. मुंबईला जाताना त्याने रेल्वेप्रवासात एक मोबाईल फोन चोरला.

मंगळवारी रात्री उशिरापर्यंत विनय घरी न आल्यामुळे त्याच्या वडिलांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. चोरलेल्या मोबाईल फोनवरून विनयने बुधवारी सकाळी त्याने चोरलेल्या मोबाईल फोनवरून घरी मेसेज केला की, ‘आपका बेटा किडनॅप हो चुका है, समोवार को सुबह आपके बेटेने जिससे पैसे लिए थे उसे 1 लाख 50 हजार रुपये दे’ तसेच काहीवेळाने आणखी एक मेसेज केला. दुसऱ्या मेसेजमध्ये त्याने लिहिले की, ‘पोलीस को या किसी और को मत बताना इसका अंजाम बरा होगा’ या दोन मेसेज नंतर त्याने पैशांची मागणी केली.
आरोपीने सुरुवातीला 1 लाख 50 हजार रुपये खंडणी मागितली. घरच्यांनी एवढे पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे मागणीचा आकडा कमी करत शेवटी त्याने 30 हजार रुपयांची मागणी केली.
दुपारी तीनच्या सुमारास आणखी एक मेसेज आला. त्यात ‘ज्यादा शहानपट्टी की, पुलीस के पास जाने की कोशीष की तो, उसकी डेड बॉडी मिलेगी, समजिए’. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आणि आरोपीचा तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे तपास करत पोलिसांनी दोन पथके तयार केली. एक पथक पिंपरी चिंचवड शहरात तर एक पथक मुंबईकडे रवाना केले. मुंबईमध्ये विनयचा शोध घेत त्याला आज (शुक्रवारी) पहाटे छत्रपती शिवाजी टर्मिनल मुंबई परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्यानेच उसने घेतलेले पैसे परत करण्यासाठी हा बनाव रचल्याचे सांगितले. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली. ही कामगिरी एमआयडीसी भोसरी आणि खंडणी विरोधी पथक यांनी संयुक्तपणे केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.