Bhosari : ‘आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्यामुळे शहरात स्वतंत्र पोलीस आयुक्तालय’

एमपीसी न्यूज- – पिंपरी-चिंचवड शहरात उच्चभ्रू लोकवस्ती आणि झोपडपट्टी अशा दोन्ही प्रकारच्या लोकवस्ती आहेत. औद्योगिक वसाहती आणि आयटी पार्क देखील आहे. पिंपरी-चिंचवड शहराने अशा दोन्ही गोष्टींचा समन्वय साधला आहे. शहराने साधलेला समन्वय सर्वच बाबतीत योग्य ठरणारा नाही. शहरात वाढणा-या लोकवस्ती सोबत शहरातील गुन्हेगारी देखील वाढू लागली. या वाढत्या गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्यातून पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरु करण्यात आले. या आयुक्तालयाच्या कारभार 15 ऑगस्ट 2018 पासून सुरु झाला आहे. आमदार महेश लांडगे यांनी सुरक्षित आणि भयमुक्त शहरासाठी केलेल्या पाठपुराव्याला यामुळे यश आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहर पूर्वी पुणे पोलीस आयुक्तालयात समाविष्ट होते. पुण्याएवढीच भौगोलिक रचना आणि लोकसंख्या पिंपरी-चिंचवड शहरात आहे. शिवाय पिंपरी-चिंचवड शहारत असलेल्या औद्योगिक वसाहत आणि आयटी पार्क परिसरात कामानिमित्त अस्थायी वेळेसाठी आलेल्या नागरिकांची त्यात दिवसेंदिवस भर पडत आहे. यामुळे शहरात लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पूर्वी पिंपरी-चिंचवड शहरात पुणे पोलीस आयुक्तालयाचे परिमंडळ तीन कार्यरत होते. एक पोलीस उपायुक्त शहरातील नऊ पोलीस ठाण्यांचा कारभार हाकायचे. पोलीस ठाण्यांची संख्या असली तरी अधिकारी आणि नियंत्रण शहराच्या जवळ नसल्यामुळे तसेच पोलिसांचा वावर कमी होत असल्याने गुन्हेगारीने शहरात तोंड वर काढले होते.

अनेक गुन्हेगारी टोळ्यांचा उदय शहरात झाला. वर्चस्व आणि आर्थिक वादातून टोळीयुद्ध होऊ लागली. खून, मारामा-या, दंगली असे गंभीर गुन्हे वाढू लागले. त्यासोबतच महिला अत्याचार आणि अन्य गुन्ह्याचे देखील प्रमाण वाढले. पिंपरी-चिंचवड शहरात पोलीस मुख्यालय, आयुक्त कार्यालय असावे, अशी मागणी यातूनच झाली. पिंपरी-चिंचवडकर नागरिकांनी शहरात आयुक्तालय सुरु करण्याची मागणी केली. आमदार महेश लांडगे यांनी या मागणीला जोर दिला. विधानसभेत याबाबत पाठपुरावा केला. त्याला राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला.

पिंपरी-चिंचवड शहरातील नऊ पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण मधील पाच पोलीस स्टेशन मिळून पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरु झाले. या आयुक्तालयाचा कारभार 15 ऑगस्ट 2018 पासून सुरु झाला. पोलीस अधिकारी आणि कर्मचा-यांचा वावर या भागात वाढू लागला. त्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत चिखली पोलीस स्टेशन नव्याने सुरु करण्यात आले.

रहिवासी कुमार गुप्ता म्हणाले, “पिंपरी-चिंचवड शहरात रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या सर्व भागातून तसेच भारताच्या देखील अनेक भागातून या शहरात लोक नोकरी, व्यवसायानिमित्त येत आहेत. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस आयुक्तालय आवश्यक होतेच. आमदार महेश लांडगे यांनी त्यांच्या ‘व्हिजन-2020’ मध्ये स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरु करण्याचे आश्वासन दिले होते. त्याबाबत त्यांनी पाठपुरावा केला आणि शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरु झाले. याचा शहरातील गुन्हेगारी कमी होऊन शांतात व सुव्यवस्था राखली जात आहे.”

स्थानिक रहिवासी महेश शिंदे म्हणाले, “पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना पूर्वी पोलीस प्रशासनासोबत संवाद साधायचा असल्यास पुण्यात जावे लागत असे. कित्येक किलोमीटरचा प्रवास करून पुणे शहर पोलीस आयुक्तालयात जावे लागत असे. त्यानंतर तिथे संबंधीत अधिकारी मिळतीलच याची खात्री नाही. त्यामुळे संपूर्ण दिवस वाया जात असे. पिंपरी-चिंचवड शहरात स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरु झाल्यामुळे काही अडचण आल्यास तात्काळ पोलीस आयुक्तालयात जाता येत आहे. काही ठिकाणचे वाहतुकीचे प्रश्न सुटले आहे. औद्योगिक वसाहतीसाठी इंडस्ट्रियल सेल सुरु झाले आहे. सायबर सेल आणि अन्य विभागांशी नागरिकांशी संपर्क वाढत आहे. आयुक्तालयाचा पिंपरी-चिंचवड मधील नागरिकांना फायदाच होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like