Bhosari : वीस वर्षांपूर्वी तयार झालेल्या आराखड्यांवर आम्ही आत्ता काम करतोय, हे शहराचं दुर्भाग्य – आमदार महेश लांडगे

रहिवासी सोसायट्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत नागरिकांसोबत आमदार लांडगे यांचा संवाद

एमपीसी न्यूज- वीस वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या शहर विकासाच्या आराखड्यांवर आम्ही सर्वजण आत्ता काम करत आहोत. प्रत्येक काम वेळच्या वेळी झाले असते तर ही दुर्भाग्यपूर्ण वेळ आज आलीच नसती. यासाठी प्रशासकीय अधिका-यांचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे. पण यापुढे असं होणार नसून प्रत्येक काम वेळच्या वेळी पूर्ण होईल. ज्या गोष्टींचा नागरिकांना त्रास होतो, त्या गोष्टी समूळ नष्ट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही आमदार महेश लांडगे यांनी दिली.

चिखली, मोशी परिसरातील रहिवासी सोसायट्यांमधील नागरिकांना येणा-या समस्या प्रशासन आणि लोकप्रतिनिधींपुढे मांडण्यासाठी चिखली मोशी हाऊसिंग फेडरेशनच्या वतीने संवादाचे आयोजन करण्यात आले. या संवादाच्या कार्यक्रमात भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांनी नागरिकांचे प्रश्न ऐकून घेत त्याच कार्यक्रमात नागरिकांच्या समस्या महापालिका प्रशासनासमोर मांडल्या. आमदार लांडगे केवळ समस्या पोहोचविण्यावर थांबले नाहीत, तर त्यांनी नागरिकांच्या प्रश्नांबाबत प्रशासनाच्या संबंधित अधिका-यांना कामे करण्याचे आदेश दिले. यावेळी या भागातील महापालिका, पोलीस, वीज वितरण, सोसायट्यांच्या तक्रारी यांसारख्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

आमदार महेश लांडगे म्हणाले, “सध्या आम्ही पुढील अनेक वर्षांचं नियोजन करीत आहोत. जाधववाडी, चिखली, मोशी, तळवडे या भागातील नागरिकांसाठी 300 एमएलडी पाणी उचलण्यात येणार आहे. यामुळे या परिसरातील अनेक वर्ष पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटेल. भामा-आसखेड धरणग्रस्तांना योग्य वेळी त्यांच्या जमिनींचा मोबदला मिळाला नाही. त्यामुळे ते शेतकरी त्या धरणातून पाणी उचलण्यासाठी विरोध करीत आहेत. या विरोधामुळे त्या धरणातून पाणी आणण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. त्या शेतक-यांना वेळीच मोबदला मिळाला असता तर आज विलंबाची ही वेळ आली नसती. पण त्यातूनही मार्ग काढत ज्याप्रमाणे पवना धरणाचे पाणी रावेत येथून उचलण्यात येते, त्याप्रमाणे भामा-आसखेड धरणाचे पाणी देहूरोड येथून उचलण्यात येणार आहे. हे काम युद्ध पातळीवर सुरु असून येत्या एक ते दीड वर्षात पाणी आणण्याचे काम पूर्ण होणार आहे”

“बांधकाम व्यावसायिकांच्या मोहक जाहिराती पाहून नागरिकांनी फसू नये. एक दुर्भाग्य असे आहे की बांधकाम व्यावसायिकांना फसवायची आणि नागरिकांना फसायची सवय लागली आहे. ही सवय बदलायला हवी. फसवणा-या बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयाबाहेर ‘या व्यक्तीकडून फ्लॅट घेऊ नका’ असा माझ्या फोटोसह बोर्ड लावा” असा सल्ला देखील आमदार लांडगे यांनी नागरिकांना दिला.

प्रशासन काम करीत नाही. त्यांच्याकडे अधिकार आहेत, पण ते त्या अधिकाराचा योग्य वापर करत नाहीत. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास होतो. पण यापुढे नागरिकांना त्रास होणा-या प्रत्येक गोष्टीवर योग्य ती कारवाई होणारच. ही कारवाई केवळ प्रशासनाच्या कागदावर होणार नाही, तर तिची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार आहे. अंमलबजावणी झालेल्या कारवाईचा मागोवा देखील प्रशासनाने घ्यावा, असे आदेशही आमदार लांडगे यांनी महापालिका प्रशासनाला दिले.

चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर म्हणाले, “काही ठिकाणी रस्त्यावर दारू पिणारे नागरिक आढळून येत आहेत. त्यासाठी रिव्हर रेसिडेन्सी, मायमर सोसायटी यांसारख्या आतल्या सोसायट्यांपर्यंत पोलीस गस्त सुरु करण्यात येणार आहे. पोलीस प्रत्येक सोसायटी पर्यंत पोहोचून नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण नागरिक पुढे येऊन समस्या सांगत नाहीत. त्यातूनच सोसायट्यांमध्ये तक्रार पेट्यांची संकल्पना राबविण्यात येत असून त्याला देखील नागरिकांचा प्रतिसाद मिळत नाही. नागरिकांना असलेल्या समस्या जर योग्य ठिकाणी मांडल्या नाहीत तर त्याचा नाहक त्रास नागरिकांनाच होणार आहे. त्यामुळे न घाबरता पुढे येऊन नागरिकांनी समस्यांसाठी आवाज उठवायला हवा. कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. महापालिकेने जाधववाडीमधील 200 अनधिकृत व्यावसायिकांना नोटिसा दिल्या आहेत. त्या व्यावसायिकांवर 19 ते 25 डिसेंबर दरम्यान कारवाई करण्यात येणार आहे”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.