Bhosari News: ठेकेदारी पद्धत रद्द करून सफाई कामगारांना कायम करा – बाबा कांबळे

एमपीसी न्यूज – रस्ते सफाई मधील भ्रष्टाचार उघड झाल्यामुळे मजूर संख्याऐवजी रस्त्याच्या स्क्वेअर फुट प्रमाणे नवीन निविदा काढून पुन्हा भ्रष्टाचार करण्याचा प्रशासनाचा मोठा डाव असल्याचा आरोप कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी केला. ठेकेदारी पद्धत रद्द करून सफाई कामगारांना कायम करावे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला.

रस्तेसफाई झाडलोट करणाऱ्या महिला-पुरुषांची भोसरी येथे विभागीय संवाद सभा झाली. कष्टकरी जनता आघाडी उपाध्यक्षा मधुराताई डांगे,योगिता गाडेकर, नीलम खांदवे,आशा सोनावणे, सुषमा स्वामी, सुवर्णा सिरसाट आदी उपस्थित होते. कोरोनामुळे सर्व सोळाशे महिला एकत्र आल्यास संसर्ग वाढेल. यामुळे कष्टकरी कामगार पंचायत वतीने विभागावर आठ क्षेत्रीय कार्यालयातील रस्ते सफाई झाडलोट करणाऱ्या महिलांची विभागवार संवाद सभा हा उपक्रम सुरू केला आहे.

महापालिकेमध्ये रस्ते साफसफाईसाठी सोळाशे महिला पुरुष कंत्राटी पद्धतीने कामे करत आहेत. गेली वीस वर्षापासून या महिला पुरुष रस्ते सफाईचे कामे करतात. एखाद्या ठिकाणी कायम कामे असतील. तर, त्या ठिकाणी ठेकेदार पद्धत बंद करून कंत्राटी कामगारांना कायम केले पाहिजे, असे कामगार कायदा प्रमाणे नियम असताना देखील पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत मात्र रस्ते साफसफाई घन कचरा प्रक्रियांमध्ये करोडोंचा मलिदा खाण्यासाठी अधिकारी ठेकेदार संगणमत करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत आहेत. त्यामुळे गेली वीस वर्षापासून चतुर्थी श्रेणी कामगारांची भरती केली जात नाही. इतर सर्व विभागात भरती सुरू आहे. परंतु, चतुर्थी श्रेणी कामगारांची भरती न केल्यामुळे अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय दलित बहुजन समाजातील कष्टकरी सफाई कामगार महिलांवर अन्याय होत आहे.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना वेळोवेळी निवेदन देऊनही त्यांनी दखल घेतली नाही. यामुळे महापालिकेवर तिव्र आंदोलन करून आयुक्ताना जाब विचारु असा इशारा यावेळी कष्टकरी कामगार पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.