Bhosari News: उकळते ऑइल अंगावर पडल्याने भाजलेल्या आईचाही मृत्यू; एकाच घरातील तिघे दगावले

इंद्रायणीनगर परिसरातील राजवाडा भागात बिल्डींग क्रमांक तीन जवळ महावितरण कडून विद्युत रोहित्र बसवण्यात आला आहे. त्या रोहित्राच्या शेजारी एका पत्र्याच्या घरात दिलीप कोतवाल कुटुंब राहत आहे.

एमपीसी न्यूज – पाच महिन्यांच्या चिमुकलीला घराबाहेरच्या अंगणात अंघोळ घालत असताना अचानक विद्युत रोहित्राचा स्फोट झाला. यामध्ये उकळते ऑइल अंगावर पडल्याने पाच महिन्यांच्या चिमुकलीसह तिची आई आणि आजी गंभीररित्या भाजल्या गेल्या. ही घटना शनिवारी (दि.5) दुपारी दीड वाजताच्या सुमारास इंद्रायणीनगर, राजवाडा येथे घडली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या चिमुकलीचा आणि तिच्या आजीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर त्यानंतर गंभीररित्या भाजलेल्या आईचा देखील मंगळवारी (दि. 8) सायंकाळी मृत्यू झाला.

हर्षदा सचिन काकडे (वय 32) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. यापूर्वी शारदा दिलीप कोतवाल (वय 51), शिवन्या सचिन काकडे (वय 5 महिने) यांचा मृत्यू झाला होता.

इंद्रायणीनगर परिसरातील राजवाडा भागात बिल्डींग क्रमांक तीन जवळ महावितरण कडून विद्युत रोहित्र बसवण्यात आला आहे. त्या रोहित्राच्या शेजारी एका पत्र्याच्या घरात दिलीप कोतवाल कुटुंब राहत आहे.

कोतवाल यांच्या घरी त्यांची मुलगी माहेरपणासाठी आली होती. शनिवारी दुपारी घरासमोरील अंगणात कोतवाल आजी त्यांच्या मुलीसह आपल्या नातीला अंघोळ घालत होत्या.

अंघोळ घालत असताना घराशेजारी असलेल्या विद्युत रोहित्राचा स्फोट झाला. रोहित्रामधून उकळते ऑईल बाहेर उडाले. हे उकळते ऑईल मयत शारदा, शिवन्या आणि जखमी हर्षदा यांच्या अंगावर पडले. यामध्ये तिघी गंभीररीत्या भाजल्या.

ही घटना घडली, त्यावेळी दिलीप कोतवाल आणि त्यांचा मुलगा घरी नव्हते. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी शिवन्याला भोसरी येथील एका खासगी रुग्णालयात तर दोन्ही महिलांना पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक उपचार केल्यानंतर बाळ शिवन्याला देखील तिच्या आई आणि आजीसोबत ससून रुग्णालयात दाखल केले.

उपचार सुरु असताना शनिवारी रात्री शारदा आणि शिवन्या यांचा मृत्यू झाला. हर्षदा देखील 80-90 टक्के भाजल्या होत्या. त्यांचाही मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

दरम्यान, या प्रकाराला जबाबदार असलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांवर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.