Pune News : पुण्यात बर्ड फ्लूचा शिरकाव ; मुळशी, दौंड संसर्गग्रस्त 

एमपीसी न्यूज – पुण्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी आणि दौंड येथील मृत कोंबड्यांचे नमुने ‘पॉझिटिव्ह’ आले आहेत. भोपाळच्या राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेच्या प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी नमुने पाठवण्यात आले होते. पशुसंवर्धन आयुक्तालयाने शुक्रवारी रात्री उशिरा प्रसिद्धीपत्रकाद्वारे हि माहिती दिली. 

प्रसिद्धीपत्रकातील माहितीनुसार,  मुळशी तालुक्यातील नांदे आणि दौंड तालुक्यातील बोरीबेल गावातील तेरा कोंबड्या दगावल्या होत्या. या मृत कोंबड्यांचे नमुने औंध येथील पश्चिम विभागीय रोग निदान प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. या प्रयोगशाळेच्या तपासणीत हे नमुने ‘निगेटिव्ह’ आले होते. मात्र, खबरदारीसाठी हे नमुने भोपाळच्या प्रयोगशाळेतही पाठविण्यात आले होते. भोपाळच्या प्रयोगशाळेकडून शुक्रवारी सायंकाळी उशिरा या नमुन्यांच्या तपासणीचे अहवाल मिळाले आहेत. त्यामध्ये हे नमुने ‘पॉझिटिव्ह’ आले आहेत.

 

अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आलेला भाग संसर्गग्रस्त घोषित करून, तेथील एक किलोमीटर त्रिज्येतील सर्व कोंबड्या नष्ट करण्याची प्रक्रिया केली जात असल्याचे प्रसिद्धिपत्रकात म्हंटले आहे. दरम्यान, कोणत्याही भागात कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलांतरीत पक्षात मर्तूक आढळून आल्यास नजिकच्या पशुवैद्यकिय दवाखान्यात याबाबत माहिती द्यावी. अथवा पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या 18002330418 या टोल फ्रि क्रमांकावर माहिती द्यावी असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.