Pimple Gurav News: भाजपा स्थायी समितीच्या अध्यक्षामुळे शहराची बदनामी, कारभारी टेंडर मिळवण्यात व्यस्त – अजित पवार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपच्या राजवटीत भ्रष्टाचाराचे पेव फुटले आहे. ज्यांच्याकडे पालिकेची सूत्रे आहेत. त्यांचे टेंडर काढणे, जवळच्या माणसाला टेंडर कसे मिळेल हे पाहणे, रिंग करण्यात लक्ष आहे. महापालिकेच्या इतिहासामध्ये स्थायी समिती अध्यक्षाला लाचप्रकरणी अटक होण्याची वेळ कधी आली नव्हती. पण, भाजपच्या अध्यक्षाला अटक झाली. त्यातून शहराची बदनामी झाली. हे शहरवासीयांना लक्षात घ्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांनी केले. भाजपच्या राजवटीत शहर विकासात मागे पडले. नियोजन नाही. पवना धरण भरले असतानाही दिवसाआड पाणी मिळत असल्याकडेही त्यांनी यावेळी लक्ष वेधले.

पिंपळेगुरव येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ता शिबिर आज (शुक्रवारी) पार पडले. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पवार बोलत होते. विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी आमदार विलास लांडे, नगरसेवक नाना काटे, मयूर कलाटे, अजित गव्हाणे, प्रशांत शितोळे आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शहरातील नागरिकांनी पक्षाला ताकद दिली. पक्षाची सत्ता असताना सर्वांना विश्वासात घेऊन शहराचा नियोजनबद्ध विकास केला. शहर अत्यंत नियोजनबद्धपणे वसविले आहे. वेळप्रसंगी वाईटपणा घेऊन रस्ते प्रशस्त केले. फ्लायवर, सब-वे, क्रीडांगणे केली. देश, जगाच्या पातळीवर शहराचे नाव पोहोचविले. मात्र, 2017 मध्ये भाजपच्या खोट्या-भूलथापांना बळू पडून नागरिकांनी त्यांच्याकडे पालिकेची सूत्रे दिली, तेव्हापासून शहर विकासात मागे पडल्याचे पवार यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, लाचखोरी प्रकरणामुळे शहराची बदनामी झाली. शहरातील नागरिकांनी अशा प्रकारच्या लोकांना कसे निवडून दिले, राष्ट्रवादीचीच सत्ता चांगली होती असे नागरिक आता बोलून दाखवत आहे. आमचे चुकलेच असं म्हणतात तुम्हीच सुत्रे हातात घ्यावी असे नागरिक म्हणतात.

पवार पुढे म्हणाले की, भाजपची केंद्रात, राज्यात, पालिकेत सत्ता होती. पालिकेत आताही आहे. पण, भाजपने अनधिकृत बांधकामाचा, शास्तीकराचा प्रश्न निकाली काढला नाही. केवळ मते मिळविण्यासाठी लोकांना भूलथापा दिल्या हे नागरिकांच्या लक्षात आणून दिले पाहिजे. पेव्हिंग ब्लॉक, रस्त्याशिवाय काहीच कामे झाली नाहीत. केवळ फलकावर नमामी इंद्रायणी म्हणून नदी पात्रातील जलपर्णी निघते का, जलपर्णी तशीच आपल्याकडे बघत राहिली. हे लोकांना दाखवून दिले पाहिजे. शहर खड्डेमय झाले आहे. नियोजन नाही. सुनियोजित विकास केला नाही. हे लोकांना पटवून दिले पाहिजे. आमच्या काळातील बेस्ट सिटी पाहिजे की आत्ताची स्मार्ट सिटी पाहिजे हे लोकांना विचारले पाहिजे. धरण भरले असताना दिवसाआड पाणी मिळत आहे.

तसेच पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किमती वाढल्या. महागाईने जनतेचे कंबरडे मोडले आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून शहरातील प्रश्न सोडवित आहोत. भामा-आसखेडचे पाणी शहरासाठी मंजूर केले पण, भाजपला ते पुढे नेता आले नाही. शहराचा चहुबाजूने विकास होत आहे. वाढते नागरिकरण आणि लोकसंख्या वाढीचा दर पाहता एकट्या पवना धरणाचे पाणी पुरणार नाही. सरकारमध्ये आम्ही आहोत. शहरातील सर्व प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहोत. स्थानिक, बाहेरील सर्वांना सोबत घेऊन कामे केली. पदे दिली. शहरातीला बाहेरचा असा भेदभाव केला नाही. सर्वांना बरोबर घेऊन सर्वांना सोबत घेऊन काम केल्याचेही ते यावेळी म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.