Chaitra : ओळख मराठी महिन्यांची… भाग 1 – हिंदू पंचांगातील पहिला महिना ‘चैत्र’

एमपीसी न्यूज (रंजना बांदेकर) – चैत्र महिन्यापासून (Chaitra) आपल्या हिंदू पंचांगातील नववर्षाची तसेच विक्रम संवत्सराची सुरुवात होते. आपल्या पंचांगातील सर्वच महिन्यांची  नावे ही नक्षत्रावरून ठेवलेली आहेत. चैत्र महिना हा चित्रा नक्षत्रापासून सुरू होत असल्याने त्याचे नाव चैत्र.

नुकतीच वसंत ऋतूला सुरुवात झालेली असते त्यामुळे सर्वत्र आनंद पसरलेला असतो .निसर्ग आपली किमया दाखवत असतो. कडूलिंब, पिंपळ इत्यादी झाडांना नवीन पालवी फुटलेली असते. आंब्याला मोहर आलेला असतो त्याचा सुवास सर्वत्र दरवळत असतो.

एका कवीने म्हटले आहे, ‘चैत्र महिना (Chaitra) बहराचा, वास आंबे मोहराचा.’ कोकीळ कुजनाला देखील प्रारंभ झालेला असतो. निसर्ग सर्वत्र सृजनाची निर्मिती करत असतो.

अशातच चैत्रशुद्ध प्रतिपदेला येतो हिंदू पंचांगातील पहिला सण गुढीपाडवा!

शुभारंभ करू शक गणनेचा।

करुनी पराभव दुष्टजनांचा।।

शालिवाहन नृपती आठवा।

चैत्रमासीचा गुढीपाडवा, गुढीपाडवा।।

लोक घराघरांवर गुढया उभारून येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत करतात. घरी गोडधोड पदार्थ करतात व एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात.

गुढीपाडव्यापासून सुरू होते ते चैत्री नवरात्र किंवा वासंतिक नवरात्र  त्यानंतर  येते रामनवमी. प्रभू रामचंद्रांचा जन्मदिवस सर्वत्र उत्साहाने साजरा होतो. त्यानंतर चैत्रात येणारा महत्त्वाचा दिवस म्हणजे चैत्र पौर्णिमा किंवा हनुमान जयंती.

चैत्र महिन्यात (Chaitra) गावोगावी जत्रा भरत असतात. उन्हाचा कडाका वाढला नसल्यामुळे लोक या जत्रांचा आनंद मनमुराद लुटू शकतात.  अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांची जयंती व पुण्यतिथी ही याच महिन्यात येते.
अशा या उत्साहाने भरलेल्या चैत्र महिन्याच्या, गुढीपाडव्याच्या व सुरू होणाऱ्या नववर्षाच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा!

(क्रमशः)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.