Chakan crime News : भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचारी वृद्ध महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात जाणा-या दुचाकीने पायी चालत जात असलेल्या एका वृद्ध महिलेला जोरदार धडक दिली. यामध्ये वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. ही घटना चाकण-शिक्रापूर रोडवर बहुळ गावाच्या हद्दीत घडली.

गणेश विठ्ठल मगर (वय 28, रा. वाघुडे खुर्द, ता. पारनेर, जि. अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. सहाय्यक फौजदार बाबुराव मानसिंग राठोड यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गंगुबाई विठ्ठल वाडेकर (वय 80) असे मृत्यू झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 ऑगस्ट रोजी रात्री साडेसात वाजताच्या सुमारास आरोपी गणेश मगर त्याच्या दुचाकीवरून (एमएच 16 / बीएल 1164) भरधाव वेगात जात होता. चाकण-शिक्रापूर रोडने जात असतना बहुळ गावाच्या हद्दीत मयत गंगुबाई रस्त्याने पायी चालत जात होत्या. गणेश याच्या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली.

या अपघातात गंगुबाई यांच्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्या ब-या होत नसल्याने डॉक्टरांनी त्यांना घरी घेऊन जाण्यास सांगितले. घरी आल्यानंतर त्यांचा 13 सप्टेंबर रोजी रात्री मृत्यू झाला.

याबाबत बुधवारी (दि. 30) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.