Chakan Crime News : चार महिन्याच्या बाळाला चोरणा-या महिलेला अटक

गर्भपात लपवण्यासाठी चोरले बाळ

एमपीसी न्यूज – चार महिन्यांच्या बाळाला घरातून चोरून नेल्याची घटना 17 फेब्रुवारी रोजी चाकण येथे मार्केटयार्डशेजारी वाफगावकर चाळीत घडली होती. त्या घटनेतील आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. तिच्या ताब्यातून बाळाची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. बाळाला चोरणा-या महिलेचा गर्भपात झाला असल्याने तो लपवण्यासाठी तिने बाळाला चोरले असल्याची धक्कादायक कबुली पोलीस तपासात दिली आहे.

राणी शिवाजी यादव (वय 28, रा. कुत्तर विहीर, आंबेजोगाई, जि. बीड) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. धनश्री राजेंद्र नागपुरे (वय चार महिने) असे अपहरण आणि सुटका झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. याबाबत राजेंद्र प्रभाकर नागपुरे (वय 53, रा. वाफगावकर चाळ, मार्केटयार्डशेजारी, चाकण) यांनी फिर्याद दिली होती.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नागपुरे राहत असलेल्या ठिकाणी एक तरुणी 17 फेब्रुवारी रोजी काम मिळवण्याच्या बहाण्याने आली. त्यानंतर तिने नागपुरे यांची मुलगी धनश्री हिला घेऊन पोबारा केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी चाकण पोलिसांनी दोन पथके तयार केली. पोलिसांनी परिसरातील 100 पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमे-यांची तपासणी केली. दरम्यान चाकण पोलिसांना माहिती मिळाली की, अपहरण करणारी महिला बालाजीनगर, मेदनकरवाडी येथे गुन्हा घडण्यापूर्वी काही दिवस राहण्यास होती. मात्र, गुन्हा घडल्यानंतर ती बेपत्ता आहे. पोलिसांचा संशय बळावला आणि पोलिसांनी त्या महिलेचा शोध सुरु केला. तिचे रेखाचित्र बनवून पोलिसांनी शोध घेतला.

आरोपी राणी यादव हिला पोलिसांनी अंबेजोगाई, बीड येथून लहान मुलीसह ताब्यात घेतले. तिच्याकडे चौकशी केली असता तिने बाळाचे अपहरण केल्याचे सांगितले.

बाळाचे जन्मदाते आई-वडील वेगळेच

फिर्यादी राजेंद्र नागपुरे हे अपहृत बाळाचे खरे पालक नाहीत. ही बाब पोलीस तपासात काही अवधीनंतर समोर आली. पुण्यात शिक्षण घेत असलेल्या एका जोडप्याला प्रेम संबंधातून हे बाळ झाले होते. त्या जोडप्याने चाकण येथील एका दवाखान्यात नागपुरे यांचे नाव देऊन बाळाला जन्म घातला. त्यानंतर नागपुरे यांना ते बाळ देऊन टाकले. त्यामुळे बाळाच्या जन्मापासून नागपुरे बाळाचा सांभाळ करत आहेत. सांभाळ करत असले तरी खरे पालक नागपुरे नसून अन्य जोडपे आहे.

गर्भपात झाल्याचे लपवण्यासाठी चोरले बाळ

आरोपी राणी हिचा गर्भपात झाला होता. गर्भपाताबाबत तिने घरच्यांना काहीही सांगितले नव्हते. त्यामुळे तिला एका नवजात बाळाची गरज होती. दरम्यान नागपुरे हे बाळाचा सांभाळ करण्यासाठी एखाद्या महिलेला शोधत होते. हे आरोपी राणी हिने हेरले. तिने बाळाला सांभाळण्यासाठी म्हणून राहायचे आणि काही दिवसानंतर बाळाला घेऊन पळून जायचे ठरवले. त्यानुसार ती नागपुरे यांच्याकडे बाळ धनश्री हिला सांभाळण्यासाठी कामाला राहिली आणि धनश्रीला घेऊन पळून गेली.

ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त रामचंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत, उपनिरीक्षक प्रमोद कठोरे, उपनिरीक्षक विजय जगदाळे, पोलीस अंमलदार सुरेश हिंगे, राजू जाधव, आर एम झनकर, हनुमंत कांबळे, संदीप सोनवणे, अनिल गोरड, मछिंद्र भांबुरे, निखिल वर्पे, मनोज साबळे, अशोक दिवटे, नितीन गुंजाळ, प्रदीप राळे, सुप्रिया गायकवाड यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.