Chakan News : इंडोरन्स कंपनीच्या गेटमध्ये अडकून एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – इंडोरन्स कंपनीच्या गेटवर गेटमध्ये अडकून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना 14 फेब्रुवारी रोजी दुपारी पावणे एक वाजता घडली आहे. याप्रकरणी 24 फेब्रुवारी रोजी तब्बल दहा दिवसानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलीस फौजदार हनुमंत वसंत बांगर यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार इंडोरन्स टेक्नॉलॉजी कंपनीच्या प्रशासनातील संबंधित अधिकारी, सिक्युरिटी ऑफिसर्स, कंपनीच्या गेटवरील गार्ड संतोष बाळासाहेब ठोकळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय देविदास डोम (वय 51) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडोरन्स कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारावर इलेक्ट्रिक ऑपरेटिंग गेट बसवले आहे. त्या गेटला मानवी सुरक्षेच्या दृष्टीने स्टॉपर लावलेला नाही. व्यक्ती गेटमध्ये चेंगरू नये यासाठी इलेक्ट्रिक सेंसर बसवले नाहीत. ही जबाबदारी कंपनी प्रशासनाची असताना प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. गेटच्या रुळावर उभे राहण्यास मनाई असल्याचा बोर्ड लावण्यात आलेला नाही. गेटवरील सिक्युरिटी गार्डच्या हलगर्जीपणामुळे 14 फेब्रुवारी रोजी दुपारी पावणे एक वाजता संजय डोम हे गेटमध्ये अडकले. त्यांच्या छातीला, बरगडीला, पाठीला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) वाघमोडे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.