Wakad News : छत्तीसगडी अभिनेत्रीकडून पिंपरी चिंचवड शहरात करून घेतला जात होता वेश्या व्यवसाय

एमपीसी न्यूज – छत्तीसगडच्या एका अभिनेत्रीकडून काही दलाल पिंपरी चिंचवड शहरात वेश्या व्यवसाय करून घेत होते. या अभिनेत्रीसह आणखी दोन महिलांची पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाने वेश्या व्यवसायातून सुटका केली. दोन दलालांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 23) ताथवडे येथील एका प्रसिद्ध लॉजवर करण्यात आली.

जितेंद्र हस्तीमल बोकाडिया उर्फ हितेश हस्तीमलजी ओसवाल उर्फ महेश उर्फ विकी (वय 48, रा. वाघोली. मूळ रा. राणी स्टेशन, जि. पाली, राजस्थान), हेमंत प्रणाबंधू साहू (वय 32, रा. पुणे-नगर रोड, वाघोली. मूळ रा. कुसुमुंडिया, दासीपुर, पंगातीरा डिंगालाल परांगजाल उडीसा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह मुकेश केशवाणी, करण, युसूफ उर्फ लंगडा शेख यांच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जितेंद्र आणि हेमंत हे दोघेजण त्यांचे साथीदार मुकेश, करण आणि युसूफ यांच्या सांगण्यावरून मोबाईलवरून व्हाट्स अप कॉल करून वेगवेगळ्या लॉजवर मुली पाठवण्याचे काम करत होते. संबंधित मुली त्यांच्या नावावर हॉटेलमध्ये रूम बुक करत असत. याबाबत सामाजिक सुरक्षा विभागाला माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पुणे-मुंबई महामार्गावर ताथवडे येथील एका प्रसिद्ध लॉजवर बनावट ग्राहकाच्या माध्यमातून सापळा लावला. त्यानंतर लॉजवर छापा मारून कारवाई करत तीन मुलींची वेश्या व्यवसायातून सुटका करण्यात आली.

सुटका केलेल्या मुलींमध्ये एक छत्तीसगडची अभिनेत्री आहे. दुसरी राजस्थान तर तिसरी मुंबई येथील आहे. सुटका केलेल्या मुलींच्या माध्यमातून आरोपी जितेंद्र आणि हेमंत यांना वेश्या व्यवसायाचे पैसे नेण्याच्या बहाण्याने बोलावून पोलिसांनी दोघांना अटक केली. आरोपींकडून 10 हजार रुपये रोख रक्कम, 9 हजार 500 रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन आणि 100 रुपयांचे इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

एका मुलीची वेश्यागमनासाठी निवड करण्यास सांगून एका ग्राहकाकडून एका वेळेचे 10 ते 15 हजार रुपये, एका दिवसाचे 20 ते 35 हजार रुपये, एका रात्रीचे 20 ते 40 हजार रुपये आरोपी घेत असत. ग्राहकाकडून घेतलेल्या रकमेतून प्रति ग्राहक केवळ दीड ते दोन हजार रुपये पीडित मुलींना दिले जात होते. यातील पीडित मुलींकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता.

आरोपी जितेंद्र याच्यावर विजापूर नाका पोलीस ठाणे सोलापूर येथे वेश्या व्यवसाय प्रकरणी गुन्हा दाखल आहे. हेमंत याच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात वेश्या व्यवसाय आणि लोणीकंद पोलीस ठाण्यात प्रोव्हिजन कायद्यान्वये गुन्हे दाखल आहेत. तर आरोपी युसूफ याच्या विरोधात चतुःशृंगी पोलीस ठाण्यात वेश्या व्यवसाय प्रकरणी गुन्हा दाखल आहे.

ही कारवाई सामाजिक सुरक्षा पथकातील पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे, धैर्यशील सोळंके, पोलीस अंमलदार विजय कांबळे, किशोर पढेर, संतोष बर्गे, नितीन लोंढे, अमोल साडेकर, अमोल शिंदे, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, सुमित डमाळ, अतुल लोखंडे, सुधा टोके, वैष्णवी गावडे, रेश्मा झावरे, सोनाली माने यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.