Pimpri News: भाजप आमदारांच्या ठेकेदारीमुळे नगरसेवकपदाचा राजीनामा – तुषार कामठे

एमपीसी न्यूज – शहराचे नेतृत्व करत असलेले भाजपचे आमदार ठेकेदार झाले आहे. त्यांच्या नातलगांना, जवळच्या लोकांना महापालिकेचे ठेके दिले आहेत. त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु आहे. या भ्रष्टाचाराविरोधात मी आवाज उठवत होतो. हेच भाजपच्या लोकांना खटकत होते. त्यामुळे मला दाबण्याचा प्रयत्न केला. आमदारांच्या हुकुमशाही, दडपशाही, भ्रष्टाचार, मोगलाईला कंटाळून मी भाजप नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्याचे तुषार कामठे यांनी सांगितले.

तुषार कामठे यांनी गुरुवारी भाजप नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी आज (शुक्रवारी) पत्रकार परिषद घेऊन राजीनामा देण्यामागची कारणे सांगितली. कामठे म्हणाले, ”शहरातील भाजपच्या नेत्यांनी ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ या पक्षाच्या घोषणेला तिलांजली दिली. महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु आहे. आमदारांच्या नातलगांना महापालिकेची कामे दिली आहेत. त्या चुकीच्या कामाविरोधात मी सातत्याने आवाज उठविला. त्यामुळे मला दाबण्याचा प्रयत्न केला. पण, मी न घाबरता चुकीच्या कामाविरोधात आवाज उठवत राहिलो. महापालिका सभागृहातही बोलत राहिलो. परंतु, मी लढत असलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढाईला भाजपच्या कोणत्याच नगरसेवकांनी साथ दिली नाही. कोणीही मदत केली नाही. चुकीच्या कामाविरोधात लढत असतानाही पक्ष कधीही माझ्या पाठिशी उभा राहिला नाही”.

”भाजपकडून प्रभु रामचंद्राच्या नावाने मते मागितली जातात. पण, माझ्या प्रभागातील राममंदिराच्या कामासाठी भाजपने निधी दिला नाही. सध्याच्या शहर भाजपमधील नेतृत्वामध्ये मूळ भाजपचा एकही गूण नाही. ते केवळ सत्तेसाठी भाजपमध्ये आले आहेत. या आमदारांनी राज्याच्या अर्थसंकल्पातून निधी आणून शहरात कोणते विकास काम केले हे सांगावे असे खुले आव्हान कामठे यांनी आमदारांना दिले. महापालिकेच्या निधीतूनच कामे केली आहेत. आमदार निधी देखील आणू शकले नाहीत”, असेही कामठे म्हणाले.

” शहराचे नेतृत्व हाती असलेल्या या आमदारांच्या नेतृत्वात आगामी महापालिका निवडणूक लढविल्यास भाजपची सत्ता जाणार हे निश्चित आहेत. माझ्याप्रमाणे आणखी 25 ते 30 नगरसेवक भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर नाराज आहेत. माझी भ्रष्टाचाराविरोधातील लढाई यापुढेही सुरुच राहील. पुढील राजकीय भूमिका लवकरच स्पष्ट केली जाईल. तुर्तास मी भाजप नगरसेवकपदाचा राजानीमा दिला असून पक्ष सदस्यत्वाचा दिला नसल्याचे” कामठे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.